केकमध्ये आढळल्या अळ्या, ग्राहकाचा संताप, पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:17 PM2019-06-04T20:17:08+5:302019-06-04T20:52:28+5:30
केकचे तुकडे करून ते उपस्थित लोकांना वाटत असतांना, एका मैत्रिणीचा केकमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या.
अंबरनाथ : अंबरनाथ येथील ओ केक शॉप या केकच्या दुकानात वाढ दिवसाचा केक घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. वाढ दिवसाच्या आनंदात केक कापून आपल्या मित्रांना केक खाऊ घालतांना केकमध्ये चक्क अळ्या आढळल्याने, वाढ दिवसाचा आनंद संतापात रूपांतरीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहकाने दुकानदाराकडे तक्रार केली असून, अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रेपाडा परिसरात असलेल्या ओ केक शॉप या केकच्या दुकानातून सोमवारी संध्याकाळी संगिता झेंडे या आपल्या मैत्रिणीचा वाढ दिवस साजरा करण्यासाठी केक घेण्यासाठी आल्या होत्या. संगिता यांनी ओ केक शॉपमधून केक खरेदी केल्यानंतर त्यांनी घरी जावून केक कापत आपल्या मैत्रिणीचा वाढ दिवस साजरा केला. मात्र कापलेला केकचे तुकडे करून ते उपस्थित लोकांना वाटत असतांना, एका मैत्रिणीचा केकमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या.
त्यामुळे संतापलेल्या संगिता यांनी ओ केकच्या दुकानात धाव घेत दुकानदाराकडे केकमधील अळ्यांबाबत तक्रार करत संताप व्यक्त केला. मात्र, दुकानदाराने ग्राहकाला दाद न दिल्याने, त्यांनी याप्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये दुकानदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.