कोविड सेंटरमधील रुग्णाच्या जेवणात अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:55 PM2020-09-24T23:55:42+5:302020-09-24T23:56:20+5:30
टाटा आमंत्रा येथील प्रकार : कंत्राटदाराविरोधात कारवाईचा बडगा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या भिवंडीतील टाटा आमंत्रा येथील कोविड केअर सेंटरमधील एका रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. त्यामुळे तेथील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टाटा आमंत्रामध्ये चंद्रेश मुंबरकर हे १९ सप्टेंबरपासून क्वारंटाइन आहेत. त्यांना बुधवारी भाजीत अळ्या सापडल्या. याबाबत त्यांनी व्हिडीओ व्हायरल केला असून, या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही येथील रुग्णांना चांगले जेवण दिले जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
दरम्यान, केडीएमसीने या प्रकरणाची दखल घेतली असून, कंत्राटदार व दुकानदार यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
याबाबत केडीएमसीचे सचिव संजय जाधव म्हणाले, ‘टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइन आणि पॉझिटिव्ह रुग्ण यांना वेगवेगळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येते. रुग्णांना दर्जेदार जेवण देण्याचा प्रयत्न आहे. बुधवारी जेवणामध्ये अळी सापडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सर्व जेवण बदलण्यात आले. याची चौकशी सुरु असून, कंत्राटदाराला सक्त ताकीद दिली आहे. ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी केले आहे, त्याचीही चौकशी करत असून, आवश्यकता वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले जाईल.’