पारसिकच्या डोंगरावर लेझरने विद्युत रोषणाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:48 PM2018-12-03T23:48:15+5:302018-12-03T23:48:25+5:30
पारसिकच्या चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयनमनोहर अशा पारसिकच्या डोंगराचे रूप आकर्षक विद्युत रोषणाईने अधिकच मोहरणार आहे.
ठाणे : पारसिकच्या चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयनमनोहर अशा पारसिकच्या डोंगराचे रूप आकर्षक विद्युत रोषणाईने अधिकच मोहरणार आहे. या डोंगरावर लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंब्रादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य कातळावर भारतीय सण, परंपरा यांच्या प्रतिमा प्रतीत करणारी आकर्षक विद्युतरोषणाई, विविध संदेश दाखवण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा ठाण्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. सोमवारी परिसराची पाहणी केल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला.
ठाणे शहराला निसर्गाचा ठेवा लाभला आहे. एकीकडे येऊरचे घनदाट जंगल, मध्ये विस्तीर्ण खाडी आणि पलीकडे पारसिकचा कडा. शहराची शान असलेला हा पारसिक कडा भारतीय संस्कृती आणि परंपरेची अनेक प्रतीके विद्युतरोषणाईच्या माध्यमातून आपल्या अंगाखांद्यावर मिरवणार आहे. पारसिक रेतीबंदर येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीची चौपाटी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तिला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पारसिक चौपाटीवरून पारसिक डोंगराचे मनोहारी रूप सायंकाळच्या आणि रात्रीच्यावेळी पर्यटकांना अनुभवता यावे, यासाठी ही विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी सोमवारी पाहणी करून अशा प्रकारची विद्युतरोषणाई करण्याचा निर्णय घेतला.