गेल्या २० दिवसात एसटीच्या मार्फतीने ठाणे पोलिसांनी केली ८४ हजार मजूरांची घरवापसी
By जितेंद्र कालेकर | Published: June 1, 2020 11:10 PM2020-06-01T23:10:24+5:302020-06-01T23:52:42+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा मजूरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी बसेसच्या मदतीने ठाणे पोलिसांनी गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या २० दिवसांमध्ये ठाणे पोलिसांनी राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसेसद्वारे तब्बल ८४ हजार ७३४ परप्रांतीय मजूरांची महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घरवापसाी केली. ठाणे पोलीस आणि एसटीने केलेल्या सहकार्याबद्दल या मजूरांनी आता आभार मानले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. गाठीशी असलेला सर्व पैसा संपल्यामुळे त्यांच्या जेवणाचेही हाल होत होते. त्यामुळेच अनेकांनी पायपीट करीत तर कधी मिळेल त्या वाहनाने अगदी जादा पैसे मोजून १५०० ते १८०० किलो मीटरचा प्रवास सुरु केला होता. यात मजूरांचे आणखीनच मोठया प्रमाणात हाल होत होते. शिवाय, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडाला होता. याचीच खंबीर दखल घेत राज्य शासनाने एसटी तसेच काही ठिकाणी रेल्वेने या मजूंराची घरवापसी केली. रेल्वेलाही अनेक अडचणी असल्यामुळे ठाणे आणि भिवंडीतून मोठया प्रमाणात एसटीद्वारे या मजूरांना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.
१० मे रोजी ३५ बसेसद्वारे ८५२ तर मजूरांना सोडण्यात आले. त्यानंतर ११ मे रोजी ११२ बसेसमधून तीन हजार २२ मजूर, १२ मे रोजी ९४ बसमधून दोन हजार ७९१ मजूरांना सोडण्यात आले. यात सर्वाधिक ३४९ बसमधून आठ हजार ७०० प्रवाशांना २४ मे रोजी सोडण्यात आले. तर २१ मे रोजी २३४ बसेसद्वारा पाच हजार ९२१ प्रवाशांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यात आले. १० ते २८ मे या २० दिवसांच्या कालावधीत तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी ठाण्यातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे आणि विशेष शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने विशेष मेहनत घेतली.