मागील २४ तासात ठाण्यात नव्या ५० हून अधिक रुग्णांची भर, ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:08 PM2020-04-30T18:08:06+5:302020-04-30T18:08:30+5:30
ठाणेकरांची चिंता वाढणारी बातमी आता पुढे येत आहे. लॉकडाऊन संपत आला असतांना आता मागील काही दिवसात शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या वाढत्या संसर्गावर नियंत्रण कसे मिळवायचे असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.
ठाणे : संपूर्ण देशातील लॉकडाऊन संपण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनावर आळा बसेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु ठाण्यात मात्र या उलट चित्र दिसून आले आहे. लॉकडाऊन संपत आला असतांना शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याची धक्कादायक चित्र दिसत आहे. ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे. तर मागील २४ तासात ठाण्यात ५० हून अधिक रुग्ण आढळून आल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या वाढत्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे वागळे इस्टेट, लोकमान्य आणि कोपरी भागातील असल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना आता प्रशासनच कुठेतरी या कामी कमी पडले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. मागील २० दिवस शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्या ५ ते १० ने वाढ होत होती. मात्र मागील १० दिवसात कोरोना रुग्णांची संख्या ही गुणाकाराने वाढतांना दिसत आहे. सोमवारी शहरात एकूण रुग्णांची संख्या ही २४१ एवढी होती. मंगळवारी त्यात १५ रुग्णांची भर पडली. त्यानंतर बुधवारी पुन्हा त्यात २३ नव्या रुग्णांची भर पडून ही संख्या २७९ वर जाऊन पोहचली. तर गुरुवारी यात आणखी ३० हून अधिक रुग्णांची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. सुरवातीला कळवा, मुंब्रा या भागातून कोरोना बाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येची बाब पालिकेला चितेंची वाटत होती. मात्र मागील काही दिवसात या भागातील रुग्ण वाढीच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. कळवा, मुंब्रा भागात घट होत असतांना तिकडे कोपरी या ग्रीन झोनमध्ये अवघ्या तीन दिवसात ११ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा भाग ग्रीन झोन मधून थेट रेड झोनमध्ये आला. तर लोकमान्य सावरकर नगर भागात एका मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल मृत्यु नंतर समोर आल्याने या भागातील रुग्णांची संख्या देखील आता झपाट्याने वाढतांना दिसत आहे. मात्र यात सर्वात धक्कादायक म्हणजे वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात मागील दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. मागील २४ तासात ५० हून अधिक रुग्ण शहरात आढळले आहेत. यामध्ये वागळे आणि लोकमान्य नगर भागातील रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
आता दोन दिवसांनी लॉकडाऊन संपुष्टात येईल अशी शक्यता आहे. मात्र ठाण्यात लॉकडाऊन संपण्याच्याच कालावधीत कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने वागळे इस्टेट भागातील काही परिसर, लोकमान्य नगर, कोपरी, मुंब्रा, कळव्यातील काही भागा माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील काही भाग आदींसह इतर महत्वाचे काम कमेंटमट झोन म्हणून घोषीत केले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या आटोक्यात कशी आणायची कोणता पॅर्टन राबवयाचा याचा पेच पालिकेला सतावू लागला आहे.