शेवटच्या दिवशी राज देणार मोदी, शहामुक्तीचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 02:36 AM2019-04-23T02:36:51+5:302019-04-23T02:37:18+5:30
सभेऐवजी मनसैनिकांशी साधणार संवाद; पालघर-ठाणे जिल्हाध्यक्षांची माहिती
ठाणे : लोकसभा निवडणुकीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचार सभा होणार नसली, तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ एप्रिल रोजी ते ठाण्यात येत आहेत. या दिवशी ते मोदी, शहामुक्तीचा नारा देऊन मनसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या ठरावीक ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. मुंबईत दोन सभा होत असताना ठाणे जिल्ह्यात त्यांची सभा होणार का, अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्यांची ठाण्यातील तिन्ही मतदारसंघांत सभा होणार नसल्याचे पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांनी लोकमतला सांगितले. त्यांची जिल्ह्यातील सभा ही वेळापत्रकात आधीपासूनच नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. परंतु, सभा घेणार नसले, तरी ते २७ एप्रिल रोजी ठाण्यातील मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यात पक्ष बळकटीच्या दृष्टीने मार्गदर्शनाबरोबरच मोदी, शहामुक्तीचा संदेशही ते देणार आहेत.
विष्णुनगर येथील पक्षाच्या कार्यालयातील त्यांची भेट हीदेखील प्रचाराचा भाग आहे. यामुळे ठाण्यातील वातावरण बदलू शकते. ते आमच्यासोबत दोन ते तीन तास असतील आणि हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.