एलपीजी शवदाहिनी मोजतेय शेवटच्या घटका, पालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:07 AM2019-02-06T03:07:51+5:302019-02-06T03:08:11+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे.
- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. देखभाल, दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त करुनही तीची दुरवस्था कशी काय झाली, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.
पालिकेने ही शवदाहिनी बसविण्यासाठी ७० लाखांची तरतूद केली. सुरूवातीला ती भार्इंदर पश्चिमेकडील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बसविण्यात आली. एकूण २४ एलपीजी सिलिंडरची क्षमता आहे. याा सिलिंडरवर किमान १८ तर कमाल २६ मृतांना अग्नी दिला जातो. एलपीजी शवदाहिनीचा वापर वाढल्याने पालिकेने त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी चिरंतर उद्योग या कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यासाठी कंत्राटदाराला दर महिन्याला ३० हजार दिले जातात. त्यामुळे शवदाहिनीची दुरूस्ती वेळेत व व्यवस्थित चालण्यायोग्य व्हावी, अशी अपेक्षा असतानाही त्याकडे कंत्राटदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्याने आजमितीस या शवदाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने कंत्राटदाराला देखभाल, दुरूस्तीसाठी दिलेली रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना एकावेळी सर्व सिलिंडर एकावेळी सुरू करावे लागतात. त्यातून गॅसची गळती होऊ लागल्याने तेथील कर्मचाऱ्याने प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात गॅस गळतीमुळे जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या स्मशानाच्या बाजूला भोलानगर व डॉ. आंबेडकर झोपडपट्टी आहे. मृतदेह भट्टीत नेण्यासाठी बसविण्यात आलेली ट्रॉली अनेकदा मध्येच थांबत असल्याने कर्मचाºयांना ती लोखंडी रॉडने ढकलावी लागते. भट्टीतील विटांची दुरवस्था झाली असून खालील भागाला गळती लागली आहे. भट्टीत मृतदेह जळताना त्यातील द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. त्यामुळे दुरवस्था झालेली एलपीजी शवदाहिनीची त्वरित दुरूस्ती, ते शक्य नसल्यास बंद करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
सिलिंडरचे रेग्युलेटर बदलण्यात आले आहेत. उर्वरित नादुरुस्त भागांची दुरूस्तीचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.
- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता
पालिकेच्या भ्रष्ट कारभाराकडे सत्ताधाºयांचाही कानाडोळा होत असल्यानेच एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था झाली आहे. तीची दुरूस्ती त्वरित व्हावी, अशी अपेक्षा असून अन्यथा काँग्रेस जनआंदोलन छेडेल.
- अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवक
अंत्यसंस्कारावेळी स्मशानात गेलो असता एलपीजी शवदाहिनीची दुरवस्था निदर्शनास आली. त्याची कल्पना प्रशासनाला दिल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. अशा पायाभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होऊ लागल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची.
- अनिल नोटियाल, समाजसेवक