खासगी सुरक्षा रक्षकांना शेवटची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:30+5:302021-05-22T04:36:30+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या सुरक्षा रक्षकांना ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या सुरक्षा रक्षकांना शेवटच्या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय बुधवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. या निर्णयामुळे स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत काही वर्षांपासून सानपाडा सुरक्षा रक्षक महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सानपाडा सुरक्षा रक्षक महामंडळाकडून १० पर्यवेक्षक आणि ३७५ सुरक्षा रक्षक, तर महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडून १५५ सुरक्षा रक्षक पालिकेने घेतले होते. या सुरक्षा रक्षकांची एक वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांची वर्षभराची मुदत संपत आल्यानंतर त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकांच्या वेतनात दर दोन वर्षांनी, तर इतर भत्त्यांमध्ये सहा महिन्यांनी वाढ होते. दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत या सुरक्षा रक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा आणि त्याच्या वेतनापोटी येणाऱ्या १९ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. या दोन्ही कंपन्यांकडून सुरक्षा रक्षक घेणे बंद करा आणि त्याऐवजी शहरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांनी केली. त्यांची ही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. या दोन्ही महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांना पालिका अधिकाऱ्याइतकेच वेतन मिळत आहे. त्यामुळे पालिकेत नेमणूक व्हावी यासाठी महामंडळामध्ये पैसे घेतले जातात, असा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला. मुदतवाढीच्या प्रस्तावात आता मान्यता देत आहोत. परंतु, यापुढे मान्यता देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षा रक्षक नेमण्यासंबंधीचे नवे धोरण लवकरच तयार करून ते महासभेपुढे सादर करावे, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.