डोंबिवलीत अखेर धावली ‘ती ’ मोराची गाडी, बच्चे कंपनीची प्रतीक्षा संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 08:43 PM2018-02-12T20:43:12+5:302018-02-12T20:44:43+5:30
डोंबिवली शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली पण गेली आठ महिने बंद अवस्थेत असलेली मोराची गाडी अखेर सुरू करण्यात आली आहे.
डोंबिवली - शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली पण गेली आठ महिने बंद अवस्थेत असलेली मोराची गाडी अखेर सुरू करण्यात आली आहे. या बंद मोराच्या गाडीसंदर्भात लोकमतने श्रेयासाठी धावलात , पण मोराची गाडी कधी धावणार? असे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. याची दखल घेत केडीएमसीने ही गाडी सुरू केली आहे. सोमवारी या गाडीतून फेरी मारताना चिमुकल्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद ओसंडुन वाहत असल्याचे पहावयास मिळाले.
नव्या स्वरूपात असलेली ही मोराची गाडी पावसाळयापुर्वी सुरू करण्यात आली खरी, पण सात ते आठ महिने बंद होती. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती. पण त्यानंतर अनेक महिने ही गाडी बंद राहील्याने श्रेयासाठी धावलात पण मोराची गाडी कधी धावणार? असा सवाल उपस्थित झाला होता. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष यांनी तर बुलेट ट्रेनचे स्वपA नंतर दाखवा पण साधी मोराची गाडी तरी आधी सुरू करा असा टोला भाजपाला लगावला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही पत्रव्यवहार करून मोराची गाडी लवकर चालू करा अन्यथा आंदोलन छेडू असे पत्र उद्यान अधिक्षक संजय जाधव यांना दिले होते. दरम्यान महापालिका क्षेत्रतील उद्यानांचा व त्यातील सुविधांचा उडालेला बोजवारा पाहता ही उद्यान खाजगी संस्थानांच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. त्याचप्रमाणो छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा देखील विकास केला जाणार आहे. श्री गणोश मंदिर संस्थानाच्या वतीने या उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. ही कंत्रटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान मोराची गाडी बंद असल्याबाबत होत असलेली टिका पाहता केडीएमसीनेच पुढाकार घेत ही गाडी सुरू केली आहे. सायंकाळी 6 ते 8 वाजेर्पयत ही गाडी चालविली जाणार आहे. सध्या कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मोराची गाडी ही आमच्या लहानपणापासून आकर्षण ठरली आहे. ही गाडी अविरतपणो सुरू राहीली पाहिजे असे मत पालक प्राजक्ता हेगिष्टे-लोध यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
तांत्रिक दोष दूर व्हावेत
मोराची गाडी सुरू झाली ही समाधानाची बाब आहे. परंतू या गाडीत अनेक दोष असून ट्रॅकही गंजलेल्या अवस्थेत आहे. लहान मुले या गाडीतून आनंद लुटत आहेत त्यामुळे दोषांची तातडीने गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर आणि उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर यांनी केली आहे.