गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:51 AM2019-04-27T01:51:00+5:302019-04-27T01:51:33+5:30

ठाणे, भिवंडी, कल्याण अवैध मतांचे प्रमाण

In the last six elections, 51 thousand 940 votes were lost | गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

Next

- प्रशांत माने 

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांतील सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते अवैध ठरल्याने वाया गेली आहेत. पूर्वीच्या ठाणे लोकसभेचे २००९ मध्ये विभाजन होऊन ठाणे आणि कल्याण मतदारसंघांची निर्मिती झाली. १९९९ मध्ये झालेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २८ हजार ३४४ मते बाद ठरवण्यात आली होती. तर, २००९ च्या निवडणुकीत अवघी सहा मते अवैध ठरली होती.

मतदानाच्या दिवशी एकही मतदार मागे राहू नये, यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी मतदानयंत्रे नव्हती. त्यामुळे मतपत्रिकांवर शिक्के मारून मतदान केले जात होते. त्यामुळे त्यावेळी अवैध मतांचे प्रमाण अधिक असायचे. आता ईव्हीएम मशीनमुळे अवैध मतांचा प्रश्नच बाद झालेला आहे. पण, तांत्रिक घोळामुळे काही मते नोंद न होण्याचे प्रमाण काही निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचारी, पोलीस तसेच सैन्य दलातील जवानांकडून होणाऱ्या पोस्टल मतदानात मते बाद होण्याचे प्रमाण आढळून आले आहे.

एकूण मिळालेल्या मतांच्या तुलनेत बाद मतांचे प्रमाण ३.०३ टक्के
ठाणे मतदारसंघात १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रकाश परांजपे यांना तीन लाख ९१ हजार ४४६ मते मिळाली होती. त्यावेळी मतपत्रिकांचा वापर झाला होता. त्या निवडणुकीत २८ हजार ३४४ मते बाद झाली होती. या अवैध मतांची आकडेवारी एकूण मतांच्या ३.०३ टक्के इतकी होती. त्याआधीच्या १९९८ आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांतही अनुक्रमे ११ हजार ४७४ आणि नऊ हजार ८१२ मते अवैध ठरली होती. हे प्रमाण एकूण मिळालेल्या मतांच्या तुलनेत १.२१ आणि १.०७ टक्के इतके होते.

एकेका मताची लढाई
पूर्वी मतपत्रिकांमुळे बाद मतांचे प्रमाण जास्त असायचे. चुकीच्या पद्धतीने शिक्के मारणे, एकाच मतपत्रिकेवर सर्वच उमेदवारांच्या चिन्हांवर शिक्के मारून ठेवणे, मतपत्रिकांवर उमेदवारांना उद्देशून पेनने संदेश लिहिणे, ही मतपत्रिका बाद होण्यामागची कारणे होती. मतपत्रिकांच्या मोजणीसाठी लागणारा वेळ आणि बाद होणाºया मतांचे प्रमाण पाहता त्यावेळी एकेक मत मोलाचे ठरायचे.

चार ते पाच आकड्यांत संख्या
१९९९ पर्यंत मतपत्रिकांचा वापर केला जात होता. त्यावेळी बाद मतांचे प्रमाण सर्वाधिक असायचे. ठाणे लोकसभा मतदारसंघात झालेल्या १९९६ ते १९९९ पर्यंतच्या निवडणुकांचा आढावा घेता १९९८ आणि १९९९ ला मते बाद होण्याचे प्रमाण पाच आकड्यांत होते. तर, १९९६ मध्ये हे प्रमाण चार आकड्यांत दिसून आले.

गेल्या सहा निवडणुकांमधील आढावा घेता ठाणे लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये सहा मते बाद ठरली होती. ही आतापर्यंतची सर्वात कमी बाद मते आहेत.

Web Title: In the last six elections, 51 thousand 940 votes were lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.