अखेर वेळुक रस्त्याला मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:41+5:302021-03-09T04:43:41+5:30
मुरबाड : नव्याने तयार होत असलेल्या कर्जत-टोकावडे-कसारा महामार्गावरील बुरसुंगे फाटा ते वेळुकदरम्यानचा दोन किमीचा रस्ता वर्षानुवर्षे खड्ड्यांत आहे. वारंवार ...
मुरबाड : नव्याने तयार होत असलेल्या कर्जत-टोकावडे-कसारा महामार्गावरील बुरसुंगे फाटा ते वेळुकदरम्यानचा दोन किमीचा रस्ता वर्षानुवर्षे खड्ड्यांत आहे. वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर गावातील तरुणांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ताे मिळाला आहे.
वेळुकच्या तरुणांनी सातत्याने प्रयत्न करून आमदार किसन कथोरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा रस्ता मंजूर होऊन ठेकेदार निवड प्रक्रियेपर्यंत पोहाेचला आहे. हा रस्ता मंजूर झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, गावातील तरुणांनी दर्जेदार कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक वर्षे दर्जाहीन कामाचा मनस्ताप भाेगला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवीन रस्त्याचे अंदाजपत्रक ५३ लाख ६३ हजार रुपयांचे आहे. रस्त्याच्या बांधकाम गुणवत्तेची दहा वर्षे हमी घेणार असाल तरच कामाला हात घाला. रस्त्याच्या कामात चालढकल सहन केली जाणार नाही. काम योग्य पद्धतीने न झाल्यास उग्र आंदोलन करून काम बंद पाडण्यात येईल, असा ठरावच ग्रामस्थांनी एकमताने केला आहे.