सरांची अखेरची भेट झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:57 PM2019-07-13T23:57:30+5:302019-07-13T23:57:33+5:30

निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते.

The last visit to Sir is not there | सरांची अखेरची भेट झालीच नाही

सरांची अखेरची भेट झालीच नाही

googlenewsNext

कल्याण : निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते. आजही सकाळी कुलाब्याहून वासिंदला जाण्यासाठी गाडी पकडली. कल्याणला गाडी आली तेव्हा फोनवरून मला दु:खद बातमी कळाली की, सरांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची अखेरची भेट झालीच नाही, अशी खंत ३५ वर्षे गोरक्षकर यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी रवी चाफे यांनी व्यक्त केली आहे.
चाफे यांनी सांगितले की, ‘मी १९९३ पासून प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियममध्ये (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) रोजंदारीवर कामाला लागलो. तेव्हापासून गोरक्षकर यांचा माझा संबंध होता. नव्या व जुन्या मुलांना सोबत घेऊन ते काम करत होते. एखाद्या वेळी आमच्या हातून चूक झाली, तर कधीही त्यांनी मला चारचौघांत सुनावले नाही. एकट्याला बाजूला घेऊन ते माझी चूक निदर्शनास आणून देत होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता. तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला होता. त्यांनी प्रदर्शने भरविली. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असता देशातील विविध राज्यांत आणि परदेशांत जाण्याची संधी मला मिळाली.’
ते पुढे म्हणाले, ‘प्रदर्शनात एखादी वस्तू मांडली असेल तर त्यावर प्रकाश नीट पडला आहे का? की त्यावर सावली पडली आहे का, याचे बारीक निरीक्षण ते करीत होते. त्यातले आम्हाला काही कळत नसताना आमच्याकडून ते पुन:पुन्हा खात्री करून घेत असत. वस्तूवर प्रकाश पडतो आहे का, याची विचारणा करीत. इतका मोठा माणूस आमच्या पातळीवर येऊन काम करीत होता. यातच मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठेपणा वाटत होता. दरम्यान, त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना मधूनमधून मी भेटत होतो. आजही त्यांच्या भेटीला निघालो होतो. कल्याणपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हा मला मोठा धक्का बसला. अखेर, त्यांची अखेरची भेट होऊ शकली नाही, याचे शल्य मला कायम राहणार आहे.’
>पद्मश्री किताबाने गौरव
गोरक्षकर यांच्या काळात म्युझियममध्ये लिफ्ट बसवली गेली. तसेच म्युझियमभोवती संरक्षक भिंत बांधली गेली. भारतातील गोष्टी व म्युझियम जगात नेण्याचे काम सरांनी केले. त्यात त्यांचे वेगळपण होते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००२ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविले होते. हा किताब मिळाल्यावर त्यांच्या वागण्याबोलण्यात व कामात कुठलाही फरक जाणवला नाही.
>कुटुंबाची
मोठी हानी
गोरक्षकर यांची भाची स्मिता गुप्ते यांनी सांगितले की, त्यांचे नाव खूप मोठे होते. आमच्या कुटुंबात त्यांना पद्मश्री मिळाली, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडून खूप लोक शिकले. सगळ्यांना त्यांनी ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्याची अपेक्षा कधीही केली नाही. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.

Web Title: The last visit to Sir is not there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.