दुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:21 AM2018-04-27T03:21:09+5:302018-04-27T03:21:09+5:30
एसआयए शाळेतील विद्यार्थी : चिंचवडजवळ गाडीतून पडून झाला मृत्यू; मामाला अपघाताची गंधवार्ता नव्हती
निलेश धोपेश्वरकर ।
डोंबिवली : मला एकदा तरी दुरंतो गाडीतून प्रवास करायचा आहे, ही त्याची इच्छा मामाने पूर्ण केली. पण, ती अखेरची ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते. डोंबिवली पश्चिमेत राहणारा अर्जुन रमेश राव (१३) हा मुलगा हैदराबादहून मामासोबत येताना बुधवारी सकाळी दुरंतोमधून पडून त्याचे निधन झाले. अर्जुनचा मृत्यू त्याच्या शिक्षकांना चटका लावून गेला. गुरुवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
साउथ इंडियन शाळेत शिकणारा अर्जुन हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. सातवीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आठवीत गेला होता. शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने दुसरा क्रमांक मिळवला होता. शाळेच्या कामामध्ये तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. शाळेत होणाऱ्या आर्मी प्रशिक्षणातही अर्जुन सहभागी होता. त्याच्या मृत्यूची बातमी शाळेत येताच शिक्षकांना धक्का बसला. तो आपल्या मामासोबत हैदराबादला मामेबहिणीकडे गेला होता. अर्जुन पहिल्यांदाच आईवडिलांना सोडून बाहेर गेला होता. दुरंतोमधून प्रवास करायची इच्छा होती, म्हणून मामाने या गाडीचे तिकीट काढले होते. बुधवारी सकाळी स्वच्छतागृहात जातो, असे सांगून तो गेला. पण, त्याचवेळी गाडीच्या दारातून पडून अर्जुनचा मृत्यू झाला. बराचवेळ झाला अर्जुन आला का नाही, म्हणून मामा संपूर्ण गाडीत त्याचा शोध घेत होते. अर्जुनचा मृतदेह चिंचवडच्या पोलिसांना रेल्वेमार्गात सापडला. त्याच्या पॅण्टच्या खिशात वडिलांचे व्हिजिटिंगकार्ड मिळाले. त्यावर असलेल्या फोनवर संपर्क साधून पोलिसांनी वडिलांना अर्जुनच्या मृत्यूची बातमी दिली. वडिलांनी तातडीने गाडीत असलेल्या त्याच्या मामाला हे कळवले.
अर्जुनचा मृतदेह बुधवारी रात्री त्याच्या घरी आणण्यात आला. तेव्हा आईवडिलांच्या भावनांचा बांध फुटला. अर्जुन हा एकुलता एक आणि बºयाच वर्षांनी झाला होता. अर्जुनचा मृतदेह घरी आणेपर्यंत तो जिवंत असेल, अशी भाबडी आशा त्याच्या आईला होती. पण, ती फोल ठरली. गुरुवारी सकाळी शिक्षिका अंत्यदर्शनासाठी गेल्या असता, ‘अर्जुन आता तरी ऊठ, बघ शिक्षिका आल्या आहेत’, असे त्याची आई वारंवार म्हणत होती. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
आई, माझी पुस्तके आणली का?
अर्जुनच्या आईने दोनच दिवसांपूर्वी शाळेतून आठवीची पुस्तके आणली होती. प्रवासातून त्याने आईला फोन करून नवीन पुस्तके आणली का, असे विचारले तेव्हा थोडी पुस्तके आणली आहेत, बाकी नंतर आणेन, असे उत्तर दिले. मी आल्यावर नवीन पुस्तके बघेन, असे तोम्हणाला. पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला.