अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांचा ठाण्याला ‘जय महाराष्ट्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:54 AM2020-03-05T05:54:59+5:302020-03-05T05:55:18+5:30
आता मी माझे पद सोडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. हे सांगताना भावुक झालेल्या आयुक्तांनी आता आपण ध्यानसाधनेसाठी जात असल्याचे सांगून ठाण्याला जय महाराष्ट्र केला.
ठाणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पूर्णविराम दिला. पाच वर्षे दोन महिने ठाण्यासाठी खूप केले. स्वप्नातही ठाण्याचा विकासच पाहिला. ठाणेकरांच्या प्रेमापोटीच मी हे करू शकलो. या कार्यकाळात काही कामे अपूर्ण राहिली असतील. काही चुका झाल्या असतील, त्या मी मान्य करतो. परंतु, आता मी माझे पद सोडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. हे सांगताना भावुक झालेल्या आयुक्तांनी आता आपण ध्यानसाधनेसाठी जात असल्याचे सांगून ठाण्याला जय महाराष्ट्र केला.
काही दिवसांपूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांत व्हॉट्सअॅपवर वाद रंगल्याने व्यथित झाले होते. त्यामुळे ते ठाणे सोडणार असल्याची चर्चा सुरूझाली होती. दुसरीकडे, त्यांना ६ महिने वाढीव मुदत मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. अखेर, आयुक्तांनी स्वत:च हे पद सोडत असून मन:शांतीसाठी धर्मशाळा, हृषीकेशला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. ठाण्याच्या विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले. काही पूर्ण झाले, तर काही अपूर्ण आहेत. काही प्रकल्पांवरून एकमत झाले, तर काहींवरून मतभेदही झालेले आहेत. मात्र, ते वैयक्तिक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.