अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:44 PM2017-10-14T17:44:55+5:302017-10-14T17:59:54+5:30
फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत.
ठाणे - शिवसेना आणि महारष्ट्र नविनर्माण सेना फटाके बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारी केली असतांना आणि रिपाइंने फटाके बंदीचे समर्थन केले असतांनाच आता पालिकेने एक पाऊल मागे येत फटाके विक्रेत्यांना फटाक्यांची दुकाने लावण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या सोमवार पासून ही दुकाने शहराच्या विविध मोकळ्या जागेत आणि व्यावसायिक संकुलांमध्ये लागली जाणार आहेत.
दिल्ली न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. तर राज्य शासनानेही याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे फटाका विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. असे असतानाच महारष्ट्र नविनर्माण सेना आणि शिवसेनेने फटाक्यावाल्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेत आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला होता. त्यावर ठाणे शहर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आ) ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन न्यायालय आणि राज्य शासनाच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती.
- कोपरीच्या व्यावसायिकांना देखील सुट
कोपरीत मागील कित्येक वर्षापासून निवासी भागात ठाण मांडून बसलेल्या फटाके विक्रेत्यांवर यंदा संक्रात ओढावणार होती. परंतु आता पालिकेच्या म्हणन्यानुसार, येथील काही फटाके विक्रेते हे निवासी क्षेत्रात येत नाहीत, काही येत आहेत, त्यामुळे जे निवासी क्षेत्रात येतात, त्यांना परवाने दिले जाणार नाहीत. परंतु जे निवासी क्षेत्रात नाहीत, त्यांना परवाने दिले जातील असे पालिकेच्या परवाना विभागाने स्पष्ट केले.
रस्त्यावर, फुटपाथवर कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भुखंड आदी ठिकाणी अशा प्रकारे स्टॉल लावले जात आहेत. त्यानुसार मागील वर्षी तब्बल २५० च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते. विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणाºया भाड्यातही पालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. दरम्यान आता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे अग्निशमन दलाने, ना हरकत परवाना देण्यास मज्जाव केला. त्यामुळे दिवाळीसाठी खरेदी केलेल्या, फटाक्यांची विक्री कशी करायची असा पेच या विक्रेत्यांना सतावू लागला होता. अखेर शुक्रवारी सांयकाळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाची बैठक घेऊन फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली. ही परवानगी देत असतांना गर्दीची ठिकाणे, निवासी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, खुली मैदाने आणि व्यावसायिक गाळ्यांच्या ठिकाणी फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाचे कुठेही उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेतली जावी असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.