लता, आशा, रफीसह सलमान, आमीर तयार होण्यासाठी ठाण्यात ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:44 AM2019-07-18T00:44:45+5:302019-07-18T00:44:54+5:30
लता, आशा, रफी यांच्यासारखे गायक-गायिका अन् सलमान, आमीरसारखे अभिनेते निर्माण व्हावेत, यासाठी आता ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे
ठाणे : झोपडपट्टी भागातून ए.आर.रहेमानसारख्या संगीतकारासह लता, आशा, रफी यांच्यासारखे गायक-गायिका अन् सलमान, आमीरसारखे अभिनेते निर्माण व्हावेत, यासाठी आता ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यानुसार, शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिका गल्ली आर्ट स्टुडिओचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यानुसार झोपडपट्टीतील मुलांना विविध संस्थांद्वारे नृत्य, अभिनय व संगीत शिकविले जाईल.
महापालिकेच्या या प्रस्तावामुळे झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळून त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा अद्याप सुधारला नसताना दुसरीकडे गल्लीतील मुलांचा दर्जा सुधारण्याचा गल्ली स्टुडिओचा दावा कितपत यशस्वी होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष राहणार आहे.
महापालिका क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख इतकी आहे. परंतु, प्रत्यक्षात आजघडीला ती २३ लाखांच्या घरात आहे. यातील ५२ टक्के नागरिक हे झोपडपट्टीत राहत असून त्यामध्ये १८ वर्र्षांखालील मुलांची संख्या १८ हजार इतकी आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे कलागुण असतानाही ते मागे पडतात. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या समाजकल्याण विकास विभागाने अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
>नऊ स्टुडिओंवर २५ लाख खर्च
ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यानिहाय ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’ची निर्मिती केली जाणार आहे. ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. त्यासाठी महापालिका शाळेची जागा शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नृत्य, अभिनय आणि संगीत यासाठी प्रत्येकी २५ लाख रु पये खर्च केले जाणार आहेत.
>महापालिका समुपदेशन करून प्रशिक्षण देणार
या माध्यमातून १८ वर्षांखालील मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. सहा ते आठ महिने इतका प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणाºया संस्थांच्या निविदा प्रक्रि येद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या संस्था झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांमधील अंगभूत कलागुण ओळखून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास ते मुलांना समुपदेशन करणार आहेत. या मुलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रण, मूल्यमापन, संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे.