उशिरा धान्य आल्याने रेशनिंग दुकानांत ग्राहकांची उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:20 AM2020-07-31T01:20:55+5:302020-07-31T01:21:04+5:30
कोरोना संसर्गाचा धोका : दुकानासमोर नागरिकांच्या रांगा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या वेगाने वाढू लागला आहे. ज्या परिसरात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, त्या परिसरात कण्टेन्मेंट झोन तयार करून नागरिकांच्या सार्वजनिक वावरावर निर्बंध घातले जातात. दरम्यान, रेशन दुकानात धान्य उशिरा आल्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे बरेचसे उद्योगधंदे अजूनही ठप्प आहेत. त्यामुळे नागरिक घरात अडकून पडले आहेत. त्यातच कण्टेनमेंट झोनमध्ये पुढील १४ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही खाजगी व्यवहारांना परवानगी दिली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानांत उशिराने येणाऱ्या धान्य पुरवठ्यामुळे अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.
बºयाच नागरिकांचे रोजगार, कामधंदे ठप्प असल्याने त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत धान्य पुरवठा होत आहे. प्रतिव्यक्ती या दराने ५ किलो धान्य पुरवठा वसईतील नागरिकांना रेशन दुकानदारांच्या माध्यमातून केला जातो. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतून या नागरिकांना वेगळा अन्न पुरवठा केला जातो. सध्या वसईच्या पुरवठा विभागाकडून तालुक्यातील रेशन दुकानांत उशिराने धान्य पुरवठा सुरू झाला आहे.
सद्यस्थितीत जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्यातदेखील लाभार्थ्यांना रेशन कार्डाच्या प्रकारानुसार वितरित केले जाणारे धान्य उशिराने आल्याने ते मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी रेशन दुकानांत होऊ लागली आहे. बुधवारी तालुक्यातील काही रेशन दुकानात धान्य पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी धान्य घेण्यासाठी गर्दी केली होती.
वसई तालुक्यात एकूण १५० रेशनिंग दुकाने आहेत. त्यापैकी बºयाच दुकानांत धान्य आले नव्हते. सकाळपासूनच रेशन दुकानांभोवती नागरिकांच्या रांगा लागतात. या वेळी धान्य घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडताना दिसते. त्यामुळे तेथे कोरोना संसर्गाचा धोका मोठा आहे. आधीच वसईत कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यात रेशन दुकानात होणारी गर्दी चिंतेत टाकणारी ठरत आहे.