ठाकुर्लीत हनुमान व्यायाम शाळेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 09:38 PM2018-10-19T21:38:37+5:302018-10-19T21:39:20+5:30
डोंबिवली येथील ठाकुर्लीमध्ये ग्रामपंचायत काळापासून असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला.
डोंबिवली - येथील ठाकुर्लीमध्ये ग्रामपंचायत काळापासून असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला. त्याच निमित्त ठाकुर्ली चोळेगाव परिसरातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवलेल्या आठ ज्येष्ठ मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नगरसेविका प्रमिला चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी या वास्तूच्या नुतनीकरणसाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळेच आता सुमारे 35 लाख रुपयांचा निधी खर्च करून येथे नवी अद्ययावत व्यायाम शाळेची वास्तू तयार झाली आहे. त्यात श्रीकर चौधरी यांनी ते गटनेते असताना विशेष तरतूद करून ठेवली होती, त्यामुळे हा निधी मिळाला, केवळ व्यायाम शाळेची इमारत बांधून उपयोग होणार नाही हे जाणून चौधरी यांनी 10 लाखांचा नगरसेवक निधी खर्च करून या ठिकाणी अद्ययावत साधन सामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चौधरी दाम्पत्याचे विशेष कौतुक असल्याचे चव्हाण म्हणाले. याठिकाणी युवकांनी यावे, चांगली शरीरयष्टी कमवावी, आणि देश कार्यात सहभागी व्हावे, शहराचे, गावाचे नाव उज्वल करावे असे आवाहन श्रीकर चौधरी यांनी केले. ते म्हणाले की, महिलांचाही विचार या ठिकाणी करण्यात आला असून लवकरच 15 लाख निधी मिळेल, त्यातून खास महिलांच्या उपयुक्त साधन सामग्री बसवण्यात येणार आहे. यावेळी चोळेगावामधील रहिवासी किसनरावजी जोशी यानी 1971 रोजी शरीर सौष्ठव स्पर्धा जिंकली होती. 1986 चा महाराष्ट्र श्री 'किताब अशोक सुदाम पाटील, मोस्ट पॉवर मॅन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट विदेश भगत, सुनील चौधरी, परेश चौधरी, गणेश इर्षे आदी मान्यवरांचा चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती राहुल दामले तसेच आतंरराष्ट्रीय ख्यातीचे शरीरसौष्ठवपटू बल्ली म्हात्रे आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.