मुंबई ठाण्यातील सर्व सामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सुरु करा: रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:10 AM2021-08-02T00:10:02+5:302021-08-02T00:18:32+5:30
सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे (लोकल) सेवाही सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणेरेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिम बाजूकडील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी साकडे घातले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे (लोकल) सेवाही सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात नगरसेवक वाघुले यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची दिल्लीत रविवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकलसेवा सुरू करावी, सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत ठाणे ते बदलापूर आणि ठाणे ते टिटवाळा ही लोकल सुरु करावी. घाटकोपर रेल्वे स्थानकात मेट्रोमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन कुर्ला किंवा घाटकोपर येथून लोकलसेवा सुरू करावी, फलाट क्रमांक एक ते बी कॅबीन रोडच्या दुचाकी वाहनांसाठी रु ंदीकरण करावे, ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवेशाच्या चार ठिकाणी प्रवाशांसाठीचे सुविधा फलक लावले जावेत. फलाट क्रमांक एक वरील बुक स्टॉलसह तिकिट खिडकीसमोर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, पुरु ष आणि महिला प्रवाशांसाठी वेटिंग रूम सुरू करावी, रेल्वे पोलिसांसाठी प्रतिक्षा कक्ष असावा. बंद असलेली वातानुकुलित डॉरमेटरी सुविधाही सुरू करावी, रेल्वे स्थानकात अद्ययावत घोषणा प्रणाली बसवावी, ठाणे पूर्व स्थानकाबाहेर चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ तयार करून परिसराचे सुशोभिकरण करावे आणि रेल्वे फलाटावरील विद्युत यंत्रणा सोलरवर सुरू करावी, आदी मागण्या नगरसेवक वाघुले यांनी केल्या आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.
* यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमवेत सुरेश पाटील, संजय चौधरी, सचिन मेधाने, कैलास खारे, मनोज विश्वकर्मा आणि हर्षराज नारंग आदीही उपस्थित होते.