‘तुझे माझे नाते सांग..!’ कार्यक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:57+5:302021-03-04T05:15:57+5:30
ठाणे : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारीला कवी प्रा. आदित्य दवणे यांनी ‘तुझे माझे नाते सांग..!’ या ...
ठाणे : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारीला कवी प्रा. आदित्य दवणे यांनी ‘तुझे माझे नाते सांग..!’ या प्रेमकवितांवर संवाद साधणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ ठाणे नगर वाचन मंदिर या संस्थेच्या मार्फत केला. कवी प्रा. आदित्य दवणे यांनी तात्यासाहेबांच्या ‘मौन’ या प्रेमकवितेने कार्यक्रमाची सुरुवात करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले.
या कार्यक्रमात मंगेश पाडगावकरांची ‘मज नव्हते ठाऊक’, कुसुमाग्रजांची ‘पुरे झाले चंद्र सूर्य’, विंदा करंदीकरांची ‘थोडी सुखी थोडी दुःखी’, वसंत बापटांची ‘सकिना’ आदी कविता सादर करण्यात आल्या. त्यासोबत एक कवी म्हणून स्वतःच्या कवितांचेदेखील सादरीकरण करून आदित्य यांच्या पिढीतील कवींच्या कवितांचाही समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता ‘तुझे माझे नाते सांग’ या आदित्य यांच्याच कवितेने झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष केदार जोशी, स्वाती कुलकर्णी, मोहिनी वैद्य, अदिती वाघ आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. कोविडमुळे हा कार्यक्रम झूमच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
महाविद्यालये सुरू झाली की या कार्यक्रमाचे आयोजन तरुणांना प्रेमाच्या माध्यमातून भाषेची आणि कवितेची गोडी लावण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत करणार असल्याचे दवणे यांनी सांगितले.
-------------