कल्याण पूर्वेतील नांदिवलीत वाहन पासिंग ट्रॅक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:18 IST2019-06-11T00:17:49+5:302019-06-11T00:18:26+5:30
पाच ट्रॅक : वाहनांच्या योग्यतेची होणार तपासणी, प्रशस्त जागेमुळे टळणार वाहतूककोंडी

कल्याण पूर्वेतील नांदिवलीत वाहन पासिंग ट्रॅक सुरू
कल्याण : कल्याण आरटीओ कार्यालयाने पूर्वेतील नांदिवली येथे उभारलेल्या पासिंग ट्रॅकवर वाहन योग्यतातपासणी सोमवारपासून सुरू झाली आहे. कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तसेच ठाणे परिसरांतील वाहनांची येथे तपासणी होणार आहे. वाहन पासिंग ट्रॅकच्या शुभारंभप्रसंगी आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह अन्य अधिकारी डी.एच. लाड, प्रज्ञा अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. नवीजुनी अशी चारचाकी हलकी वाहने, बस, ट्रक, ट्रेलर या वाहनांची योग्यता तपासली जाणार आहे.
कल्याण आरटीओ कार्यालयास रस्ते सुरक्षा निधीअंतर्गत वाहन फिटनेस टॅÑक तयार करण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर, कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील नांदिवली परिसरात १० हेक्टर जागेवर वाहन फिटनेसतपासणी ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी पावसामुळे हे काम थांबले होते. दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते झाले नाही. दिवाळीनंतर कामाला गती मिळाल्याने तेथे पाच ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ट्रॅक बांधणे व इमारतीचा खर्च पाहता दोन कोटी ७१ लाख रुपये या कामावर खर्च होणार आहेत. ट्रॅकचे काम पूर्ण झाले असले, तरी इमारतीचे काम अद्याप बाकी आहे.
वाहन फिटनेसतपासणी ही सरकारच्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार गाडी खरेदी केल्यापासून दोन वर्षांनंतर आणि त्यानंतर दर वर्षाला करणे आवश्यक आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार वाहनतपासणी आठ वर्षांत दर दोन वर्षांनी करणे बंधनकारक राहणार आहे. वाहनतपासणीसाठी नांदिवली येथे जागा प्रशस्त आहे. त्यामुळे तेथे वाहनांनी नंबर लावल्यास वाहतूककोंडी होणार नाही. मात्र, कल्याण-मलंग रोडवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.
बांधकाम लवकरच
आरटीओचे कार्यालय बिर्ला कॉलेज मागील कोकण वसाहतीत आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने उंबर्डे येथील सव्वादोन एकर जागेत नवे कार्यालय उभारले जाणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १० टक्के रक्कम सरकारने वितरित केली आहे. या रकमेतून तेथे नवीन कार्यालयाच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे ससाणे म्हणाले.