आदिवासी नागरिकांना मोफत तुरडाळ आणि खाद्य तेल वाटपाच्या योजनेचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 08:20 AM2019-09-20T08:20:09+5:302019-09-20T08:20:41+5:30
'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे.
जव्हार: पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येकी २ किलो तुरडाळ व १ किलो खाद्य तेल मोफत देण्याच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ आज राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. कुपोषणामुळे जव्हार मोखाडा तसेच राज्यातील इतर भागात शेकडो बालकांच्या मृत्युमुळे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते.
त्यावेळी 'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाला ६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे ही योजना ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे अशाप्रकारची योजना राबविण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. यावेळी मार्ग दर्शन करताना "आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराने तुरडाळ किंवा खाद्य तेल काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार (essential commodities act) गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंडित यांनी दिले.
आदिवासी नागरिकांनची क्रयशक्ती कमी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे पोषण व्हावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ति वाढावी यासाठी या योजनेद्वारे मोफत डाळ व खाद्य तेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विवेक पंडित यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमंत सावरा तसेच इतर अधिकारी व मान्यवरांसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.