विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!

By अजित मांडके | Published: March 4, 2023 09:02 PM2023-03-04T21:02:46+5:302023-03-04T21:03:30+5:30

एकनाथ शिंदे यांनी दिला अधिकाऱ्यांना इशारा

Laxity in development work will not be tolerated says CM Eknath Shinde | विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!

विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी आलेला आहे, त्या निधीचा योग्य विनियोग करा, हा जनतेचा पैसा आहे, त्यामुळे गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजे. परंतु तरी देखील विकास कामांमध्ये कचुराई केली किंवा हलगर्जीपणा केला तर तो खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई देशाची राजधानी आहे, या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्ते देखील खड्डे मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.  तलाव सुशोभीकरणाचे कामही ठाण्यात हाती घेण्यात आली आहेत. जोगीला तलावाचे पुनवुर्जीवण केले जात आहे. अशाच पध्दतीने ठाण्याची जी तलावांचे शहर म्हणून ओळख आहे, ती पुसु द्यायची नसल्याचेही त्यांनी सांगितले.  चांगले रस्ते, सार्वजनिक शौचालये स्वच्छ झाली पाहिजे. त्यानुसार योग्यरित्या कामे करा, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांकडे प्राधान्याने लक्ष द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे शहर हे बदलते आहे. रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. कॉंक्रीटीकरणाची कामेही वेळेत करा असेही त्यांनी सांगितले. शहराचे एन्ट्री पॉईंट ही शहराची ओळख असते, त्यानुसार हे एन्ट्री पॉईन्ट ठाण्याची ओळख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. ठाणेकरांचा वाहतुक कोंडीतून सुटका करायची आहे. त्यामुळे शहराच्या बाहेरुन वाहतुक नेण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून जो काही निधी मिळाला आहे, त्याचा  विनियोग करा, जनतेसाठी पैसा वापरला गेला पाहिजे. चांगले रस्ते, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालये आदींसह इतर कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. जे या कामात कचुराई करतील अशांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर कळवा रुग्णालयात देखील डॉक्टर चांगले काम करीत आहेत. परंतु त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत, त्यामुळे जे सुविधा देत नसतील त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे,  तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे कोणीही विकासापासून वंचित ठेवला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  ठाण्याला आंतराष्ट्रीय दर्जाची ओळख निर्माण करुन देण्याचे काम तुमचे आमचे आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरला लवकरच सुरूवात

क्लस्टरचा विकास लवकर केला जाणार आहे, यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरवात करा असेही त्यांनी सांगितले. आपल्याला संक्रमण शिबिरात राहावे लागेल अशी नागरीकांना भिती वाटत आहे. मात्र त्यांना तेथे न राहता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Laxity in development work will not be tolerated says CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.