एलबीएस मार्ग रुंदीकरण कारवाई सुरू
By admin | Published: April 14, 2016 01:29 AM2016-04-14T01:29:37+5:302016-04-14T01:29:37+5:30
बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे : बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, इटर्निटी मॉलसमोर व त्याबाजूची सर्व बाधित बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे तीनहातनाका चौकामध्ये इटर्निटी मॉलच्या बाजूला असलेली वाढीव अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. एलबीएसवरील दोन्ही बाजूंची वाढीव बांधकामे निष्कासित करून त्या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
या कारवाईमध्ये जवळपास ५५ बांधकामे तोडण्यात आली. त्या वेळी त्यांनी रहेजा कॉम्प्लेक्स ते तीनहातनाका हा रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजंूची अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले. दरम्यान, कशिश पार्क येथे सुविधा भूखंडावर बांधकाम टीडीआरअंतर्गत ७ मजली इमारत बांधून त्यातील ३ मजले पार्किंगसाठी आणि उर्वरित ४ मजले प्रशासकीय कारणासाठी वापरण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यामुळे कशिश पार्क परिसरातील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
वाघबीळ येथे टीजेएसबी बँक ते विजय गार्डन या कारवाई अंतर्गत एकूण ७० ते ७५ बाधित बांधकामे तोडण्यात आली. यामुळे रस्त्यावर असलेल्या दोन शाळा, दोन मैदाने आणि एक उद्यान येथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता मिळणार आहे.