पालघरमधील प्रचारात बळीराम जाधवांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:21 PM2019-04-24T23:21:54+5:302019-04-24T23:22:19+5:30

रिक्षा सर्वसामान्यांना परिचयाची; अवघ्या १२ दिवसात पिंजली शेकडो गावे

The lead of Baliram Jadhav in Palghar | पालघरमधील प्रचारात बळीराम जाधवांची आघाडी

पालघरमधील प्रचारात बळीराम जाधवांची आघाडी

Next

पालघर : मतदारसंघातील प्रचाराला चांगलाच वेग आला असून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यांचे हजारो कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचार करत आहेत.

त्यांना यंदा शिटटी ऐवजी रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे.रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा त्यांना वरदान ठरल्या आहेत.त्यांचे शिट्टी हे चिन्ह गोठवण्याचा आयोगाने घेतलेला निर्णय देखील त्यांच्या पथ्यावर पडला आहे.त्यांचे नेते आ.हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या १२ दिवसात वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर,डहाणू व विक्र मगड या सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो गावपाडे अक्षरश: पिंजून काढले. मतदारांचा मिळणार्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

नालासोपारा येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत आ.ठाकूर यांच्यावर झालेल्या टीकेमुळे वसईकरानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याचे पडसाद मतदानाच्या दिवशी उमटतील असा अंदाज आहे.त्यामुळे सेनेच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण पावणे एकोणीस लाख मतदारांपैकी १० लाख मतदार वसई,नालासोपारा व बोईसर या ३ विधानसभा मतदारसंघात असून या तिन्ही मतदारसंघावर आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. ते मोडून काढणे आजवर कोणालाही शक्य झाले नाही. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३ दिवस नालासोपार्यात डेरा टाकला होता,परंतु त्यांनाही हात टेकावे लागले होते. यंदाही युतीने तसेच प्रयत्न सुरू ठेवले आहेत.विविध राज्यातील नेत्यांना वसईत पाचारण करण्यात येणार आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज येणार होते,परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला,व त्यांच्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पाठवण्यात आले.गेल्या खेपेस बविआला एकूण मतदानापैकी ५३ टक्के मते याभागात मिळाली होती,त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

हितेंद्र ठाकूर यांची राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारावर टीका
गेल्या काही दिवसात आ.ठाकूर यांनी वसई व नालासोपारा येथे झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या दिशाहीन कारभारावर जोरदार टीका केली.ते आपल्या भाषणात म्हणाले,हे सरकार केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जपणारे सरकार आहे.नोटबंदीचा फायदा केवळ धनदांडग्यांना झाला,सर्वसामान्य माणूस मात्र सरकारच्या या निर्णयाचा बळी ठरला. १५ लाख तर आले नाहीत,पण जनधन योजनेची खाती ज्यांनी उघडली होती ती आता बंद करण्यात आली असून लोकांचे पैसे बुडीत खात्यात जमा झाले.अशा या सरकारला जनतेचे सरकार म्हणता येईल का ? आज सातीवली,वालीव,जूचंद्र व नालासोपारा पूर्व येथे झालेल्या सभेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून युतीच्या नेत्याचे धाबे दणाणले आहे.

Web Title: The lead of Baliram Jadhav in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.