आघाडी झाली पण मनोमिलनाचा अभाव
By admin | Published: January 30, 2017 02:00 AM2017-01-30T02:00:11+5:302017-01-30T02:00:11+5:30
परस्परांबद्दल असलेली नाराजी, क्षमतेबद्दल शंका यामुळे गोलमैदानातील भाजपा, ओमी कलानी आणि रिपाइंच्या विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन फसले.
सदानंद नाईक, उल्हासनगर
परस्परांबद्दल असलेली नाराजी, क्षमतेबद्दल शंका यामुळे गोलमैदानातील भाजपा, ओमी कलानी आणि रिपाइंच्या विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन फसले. सभेच्या ठिकाणी ओमी कलानी यांनी हाती तलवार घेऊन केलेला प्रवेश, सभा सुरू होईपर्यंत अर्ध्याअधिक रिकाम्या झालेल्या मैदानामुळे चर्चेला ऊत आला. तिन्ही पक्षांत आघाडी झाली, मात्र नेत्यांचेच मनोमिलन झाले नसल्याचे यातून दिसून आले.
उल्हासनगरातील राजकारण गेले काही महिने ओमी कलानी टीम आणि भाजपाभोवती फिरते आहे. पक्षातील एका गटाची नाराजी लक्षात घेऊन ओमी टीमला प्रवेश न देता भाजपाने त्यांना सोबत घेत विकास आघाडी तयार केली. दोन्ही पक्षांतील विद्यमान नगरसेवकांना उमेदवारीचे आश्वासन देत फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. गोलमैदान बुक करून भाजपा आणि ओमी टीमने विकास आघाडीच्या घोषणेसोबत शक्तिप्रदर्शनाची तयारी केली. पण, सभा सुरू होईपर्यंत नागरिकांसह महिलांनी घरी जाण्यासाठी रीघ लावली. अवघ्या अर्ध्या तासात अर्धेअधिक मैदान रिकामे झाल्याने शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले.
पालिकेवर महापौर भाजपाचा या संकल्पनेतून ओमी कलानी टीमला भाजपाने जवळ केले. या आघाडीचे पडद्यामागील सूत्रदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचे उघड झाले. त्यांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर भाजपा आणि ओमी टीम एकत्र आल्याचे पुन्हा सांगितले.
ओमी यांना सत्तेची चाहूल लागत असतानाच त्यांच्या टीमला गळती लागली आहे. राष्ट्रवादीतही नवा प्रवाह उदयाला आला. ओमी यांच्यासोबत राष्ट्रवादीतील १९ पैकी १४ नगरसेवक राहिले. इतरांनी विविध पक्षांत प्रवेश केला. मनाजोगत्या प्रभागातून तिकीट मिळाले नाही, तर ओमी टीममधील निम्मे नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत परततील, असे भरत गंगोत्री सांगत आहेत. आघाडीच्या वाटाघाटी दोन दिवसांत अंतिम टप्प्यात येतील, तोवर गट फुटू नये, म्हणून शेवटच्या दोन दिवसांत सर्व पक्ष आपापल्या याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे.