आघाडीचे जागावाटप गेले पुन्हा लांबणीवर

By admin | Published: January 14, 2017 06:20 AM2017-01-14T06:20:04+5:302017-01-14T06:20:04+5:30

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी ज्या जागांसाठी घोडे अडले

Leader of the alliance has been postponed again | आघाडीचे जागावाटप गेले पुन्हा लांबणीवर

आघाडीचे जागावाटप गेले पुन्हा लांबणीवर

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी ज्या जागांसाठी घोडे अडले आहे, त्याबाबतची चर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अनुपस्थितीमुळे शुक्रवारीदेखील होऊ शकली नाही. त्यामुळे ती बैठक आणखी लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आतापर्यंत आघाडीच्या दोन चर्चा पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, माजी शहराध्यक्ष हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय भोईर, आमदार निरंजन डावखरे, तर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, सुमन अग्रवाल आणि निरीक्षक राजेश शर्मा, मेहुल वोरा आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीचे निरीक्षक गणेश नाईक यांना, तर काँग्रेसचे निरीक्षक माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अहवाल दिला जाणार आहे.
शहरातील २० पॅनलवर सकारात्मक चर्चेचा सूर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत घेतला आहे. १३ पॅनलची चर्चा शिल्लक आहे. कळवा आणि मुंब्रा येथे मैत्रीपूर्ण लढतीबाबतचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होणार होता. मात्र, तेथील स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे बाहेरगावी असल्यामुळे शुक्रवारी होणारी ही बैठक आता लांबणीवर पडली असून त्याबाबत शनिवारी किंवा येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आघाडीची चर्चा सकारात्मक असल्यामुळे तोडगा निघेल, असा दावाही आनंद परांजपे आणि मनोज शिंदे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Leader of the alliance has been postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.