विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे लियाकत शेख
By admin | Published: March 22, 2016 02:13 AM2016-03-22T02:13:50+5:302016-03-22T02:13:50+5:30
विरोधकांमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून डावलल्याने राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर
भार्इंदर : विरोधकांमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून डावलल्याने राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने प्रमोद सामंत यांच्या नियुक्तीचा ठराव रद्द केला. यामुळे महापौर गीता जैन यांनी शनिवारच्या महासभेत अखेर राष्ट्रवादीचे लियाकत शेख यांची त्यापदी निवड जाहीर केली.
सत्ताधाऱ्यांतील भाजपाच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकपदे असतानाही राष्ट्रवादीने त्यातील एका पदावर पक्षीय बलाबलानुसार दावा केला होता. भाजपा व राष्ट्रवादीचा हा वाद थेट उच्च न्यायालयात गेला. त्यात भाजपाची सरशी झाली. त्याला राष्ट्रवादीमुळे मोठा विलंब लागल्याची सल भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वर्मी लागली होती. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर भाजपाने सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदावरील दाव्याला बगल देत महापौर गीता जैन यांच्या निर्णयाद्वारे काँग्रेसचे सामंत यांची वर्णी लावली. त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेत सरकारकडे महापौरांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यालाही विलंब होऊ लागल्याने राष्ट्रवादीचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी जुलै २०१५ मध्ये उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत त्याचा निर्णय त्वरित घेण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारने महापौरांचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये रद्द केला. २४ फेब्रुवारीच्या महासभेत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाली नसल्याचे कारण पुढे करत महापौरांनी पदावरील नियुुक्तीचा निर्णय न घेता राष्ट्रवादीला पुन्हा चपराक दिली. त्यामुळे संतप्त राष्ट्रवादीने पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने अलीकडेच पालिकेला येत्या महासभेत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याची सक्त ताकीद दिली होती. (प्रतिनिधी)