नेते सुसाट, तर कार्यकर्ते मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:05 AM2019-10-17T00:05:02+5:302019-10-17T00:05:12+5:30
कार्यकर्त्यांवर कारवाईस टाळाटाळ : पक्षश्रेष्ठींचे बंडखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी पाच मतदारसंघांत प्रमुख पक्षांत मोठी बंडखोरी झाली असून सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी तुरळक अपवाद वगळता बंडखोरांवर कारवाई न केल्याने नेते सुसाट, तर कार्यकर्ते मोकाट असे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याविरोधात प्रकाश जंगम यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, त्यांच्यावर शिवसेनेने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू ठेवला आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघात तिकीट नाकारल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात बंडखोरी केली असून त्यांनी हकालपट्टीची कारवाई टाळण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्यासोबत कल्याणमधील भाजपच्या अनेक नगरसेवकांसह पदाधिकारी उघडउघड प्रचार करीत आहेत. यात आजी- माजी उपमहापौर, सरचिटणीसांसह महिला मोर्चाच्या पदाधिकारी, परिवहन सदस्य, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्षांचा समावेश आहे. यातील काही ठिकाणी पक्षाने नवे वॉर्ड अध्यक्ष नियुक्त केले असले, तरी इतर मात्र मोकाट आहेत.
कल्याण पूर्वेत उल्हासनगर येथील शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात बंड केले असून त्यांच्यासोबत पक्षाचे १५ नगरसेवक प्रचार करीत आहेत. त्यांनी आपले राजीनामेही पक्षाकडे पाठवले असले, तरी ते न स्वीकारता पक्षाने मूकसंमती दिल्याचे दिसत आहे. उल्हासनगरातही राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींच्या प्रचारात त्यांचे पुत्र ओमी कलानी यांच्या टीमचे १५ नगरसेवक छुपेपणाने उतरले असून भाजपने तिघांनाच नोटीस बजावल्याची चर्चा आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कुमार आयलानी यांचे टेन्शन वाढले आहे.
मीरा-भार्इंदरमध्येही गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असली, तरी त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी मेहतांविरोधात प्रचार करीत आहेत. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे विजय माने यांनी अखेरच्या टप्प्यात बंडाची तलवार म्यान करून म्हात्रेंच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.
घटक पक्षांचेही अभय
मुरबाडमध्ये भाजपच्या किसन कथोरेंविरोधात आरपीआयच्या एका गटाने बंड पुकारले आहे. हीच गत अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही आहे. आघाडीपेक्षा युतीत बंडखोरी जास्त असून, घटक पक्षांनी बंडखोरांवर कारवाई न करता अप्रत्यक्ष पाठबळ दिले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे मोठे पीक जवळपास सर्वच पक्षांमध्ये फोफावले आहे. बंडखोरीचे प्रमाण एवढे जास्त आहे की, कारवाई करावी तरी कुणाकुणावर, असा प्रश्न बहुतांश मोठ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे मोठे पीक जवळपास सर्वच पक्षांमध्ये फोफावले आहे. बंडखोरीचे प्रमाण एवढे जास्त आहे की, कारवाई करावी तरी कुणाकुणावर, असा प्रश्न बहुतांश मोठ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.