मोबाईलवर भाजप नेत्याचा फोटो ठेवून महापालिकेच्या इमारतीतच वाढदिवस, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:57 IST2021-09-26T15:56:41+5:302021-09-26T15:57:28+5:30
महापालिका इमारतीत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातच शुक्रवारी रात्री मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला.

मोबाईलवर भाजप नेत्याचा फोटो ठेवून महापालिकेच्या इमारतीतच वाढदिवस, व्हिडिओ व्हायरल
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील महापालिकेच्या इमारतीत भाजपच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनी एका स्थानिक नेत्याचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या भाजपातील समर्थकांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम चालवले होते.
मीरारोडच्या प्रभाग १८ मधील भाजपा नगरसेविका विविता नाईक व भाजपच्या महिला कार्यकर्त्या रितू चतुर्वेदी, बिंदू उपाध्याय, भरती सोमवंशी आदींनी पुनम गार्डन परिसरात असलेल्या महापालिका इमारतीत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातच शुक्रवारी रात्री मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला. इमारतीच्या तळमजल्यावर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तर पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. सदर इमारत महापालिकेची असताना नाईकसह भाजपा कार्यकर्त्यांनी परवानगी न घेताच कार्यक्रम केल्याचे व्हायरल व्हिडीओ व छायाचित्रांवरून उघडकीस आले. जमलेल्या भाजपा नगरसेविका व कार्यकर्त्यांनी तर मास्कदेखील घातलेले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमांचेसुद्धा उल्लंघन केले गेले.
या प्रकाराने महापालिका इमारतीत झालेल्या ह्या वाढदिवस कार्यक्रमावरून विविध स्तरातून टीकेची झोड उठत आहे. पालिकेची कोणतीच परवानगी न घेता वाढदिवसाचा कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.