नेत्यांनी गावाचा सोडून स्वत:चाच केला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:14 AM2021-01-11T00:14:51+5:302021-01-11T00:15:09+5:30

निवडणूक आली की वाटली जाते आश्वासनांची खैरात : मूलभूत मुद्यांवर गावागावात सुरू झाली चर्चा

Leaders left the village and developed themselves | नेत्यांनी गावाचा सोडून स्वत:चाच केला विकास

नेत्यांनी गावाचा सोडून स्वत:चाच केला विकास

Next

ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. निवडणुका आल्या की, आश्वासनांची खैरात वाटली जाते. प्रत्यक्षात आजही बहुतांश गावांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही अनेक गावांमध्ये मूलभूत समस्या कायमच आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून नेत्यांनी गावांचा नव्हे तर स्वत:चाच कायापालट केल्याचे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हे सर्वच मुद्दे गावागावात चर्चेला आले आहेत. याच पार्श्वभूमिवर ‌भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील समस्यांचा घेतलेला हा आढावा.... 

भिवंडी तालुक्यात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या
दीपक देशमुख
वज्रेश्वरी : ग्रामपंचायतींना समस्या सोडविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात निधी देते. मात्र वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याने आजही भिवंडी तालुक्यातील कित्येक ग्रामपंचायतींमध्ये सुविधांचा अभाव आहे. फक्त निवडणुका आल्यानंतर स्थानिक नेते जाहीरनामा प्रसिद्ध करून गावातील समस्या सोडवण्याची आश्वासने देतात. परंतु त्यानंतर त्यांना विसर पडतो, असे चित्र भिवंडीतील काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी निवडणुका होतात. कारण येथील काही ग्रामपंचायती या एवढ्या श्रीमंत आहेत की, त्यांचे वार्षिक उत्पन्न एका नगरपालिकेच्या बजेटपेक्षाही जास्त आहे. ठाणे, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यात सरकारने गोदाम पट्टा जाहीर केल्यानंतर येथील जागांचे भाव गगनाला भिडले. येथील हजारो एकर जागांवर मोठमोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे उभी राहिली. यामुळे ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा महसूल मिळतो. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावेळी होत आहेत. त्यापैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

काल्हेर, कशेळी, दापोडा, वडपा, दिवे-अंजूर, वळ, माणकोली, सरवली ग्रामपंचायतींचे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात आहे. येथील बहुतांश नागरी समस्या मार्गी लागल्या आहेत. परंतु काही ग्रामपंचायतीच्या हद्दीत अजूनही घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटारे आणि पुरेसा पाणीपुरवठा या सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी नागरिकरण झपाट्याने झाले. परिणामी, दाटीवाटीने घरे, इमारती झाल्या. त्यामुळे या ठिकाणी मोकळ्या जागांचा प्रश्न निर्माण होऊन, कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली. 

श्रीमंत ग्रामपंचायतीही सुविधांच्या बाबतीत गरीबच
भिवंडी, पूर्व भागातील शेलार, वडपा, पडघा, झिडके या ग्रामपंचायतीही श्रीमंत आहेत, परंतु या ठिकाणीही कित्येक मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. शेलार, झिडके येथे कचऱ्याची आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे या सर्वात मोठ्या सुविधांची गरज आहे, तर पडघासारखी मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी तेथील मुख्य रस्ता आणि मार्केटयार्ड या सुविधा आजही लोकप्रतिनिधींनी सोडविलेल्या नाहीत. इतर ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य, पाणी, स्मशानभूमीची दुरवस्था, घरकुले अशा प्रकारच्या सोयी झालेल्या नाहीत.

शहापूर तालुक्यात घरकुलांचा मुद्दा कळीचा 

निवडणुकीमुळे स्थानिक मुद्यांना आले महत्त्व

जनार्दन भेरे
लोकमत न्यूज नेटवर्क 
भातसानगर : सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीमुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक मुद्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यात घरकुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहापूर तालुक्यात मागील वर्षी घरकुले मंजूर न झाल्याने कोणत्याही लाभार्थ्याला देता आली नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये हा कळीचा मुद्दा बनला आहे. भावसे गावातील रस्ते, पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. यासाठी प्रशासकीय बाबी अडचणीच्या ठरत आहेत, हेही तितकेच खरे आहे.

अल्याणी गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात सर्वच शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत असल्याने, त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचत नाही. त्यांना या सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही, ही मोठी अडचण आहे. या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर देणे आवश्यक आहे. चेरपोली ग्रामपंचायत ही शहापूरमध्ये असल्याने, तिचा थेट संबंध तालुक्याच्या महत्वाच्या बाजारपेठेशी येतो. मात्र, येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अनेक टोलेजंग इमारतींना पुरेसे पाणीही मिळत नाही, ही त्यांची ओरड आहे. पाणीयोजना मंजूर केली असल्याने तो मिटेल, असा विश्वास दिला जात आहे. यामध्ये चिंचपाडा व बामणे हे परिसरातील गावपाडे यांचा समावेश होतो. ही योजना पूर्ण झाल्यास या गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होणे, या गावांसाठी आणि तेथील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

समस्यांची भरमार 
दहिवली ग्रामपंचायतीचा विचार केल्यास येथील गावात रस्ते, पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. डोळखांब ही तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. तरीही उपलब्ध निधीच्या मानाने ते शक्य होत नाही, अशी ओरड अनेकवेळा केली जाते. येथे रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून, ते हटविण्यासाठी निधीची गरज नसतानाही यात प्रशासनाला अपयश आले आहे.

 

Web Title: Leaders left the village and developed themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे