अस्वाली वाहिनीतून गळती
By admin | Published: April 7, 2016 01:06 AM2016-04-07T01:06:14+5:302016-04-07T01:06:14+5:30
या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे.
बोर्डी : या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसामुळे जलस्रोत आटले आहेत. आगामी काळात जलसंकटाची छाया गडद होत असल्याने या जलवाहिन्यांची तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बोर्डी परिसरातील पश्चिम घाटाच्या बारडा या डोंगररांगांतून उगम पावणाऱ्या नदीच्या व पावसाच्या पाण्यावर अस्वाली ग्रामपंचायतीच्या पूर्वेला लघुपाटबंधारे विभागाने धरण बांधले आहे. त्याच्या सिंचनाखाली येणारे हे क्षेत्र आदिवासी भागातील असून त्यामुळे चिकू, नारळ या बागायतींसह दुबार शेतीसाठी वरदान ठरले आहे.
शासकीय योजनेद्वारे घोलवड ग्रामपंचायत आणि झाई, बोरीगाव या ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत गावपाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. याकरिता अस्वाली ग्रामपंचायतीच्या हद्दीतून भूमिगत जलवाहिनी बांधण्यात आली आहे. ती मधून अस्वाली ग्रामपंचायत आणि शासकीय आश्रमशाळानजीक तसेच दांडेकरपाडा येथे गळती होऊन पाणी वाया जात आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलस्रोतांची पातळी खाली गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात या नासाडीची भर पडते आहे.