अंजूरफाटा येथे ‘स्टेम’च्या पाइपलाइनला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:11+5:302021-09-08T04:49:11+5:30
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या पाइपलाइनला अंजूरफाटा येथील मुख्य चौकात गळती लागली आहे. ...
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या पाइपलाइनला अंजूरफाटा येथील मुख्य चौकात गळती लागली आहे. दोन महिन्यांपासून या पाइपलाइनमधून पाणी वाया जात आहे. याकडे स्टेम प्राधिकरण व पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबद्दल स्थानिक नागरिकांसह प्रवासी व वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
चोवीस तास पाणी गळती सुरू असल्याने येथे अनेक वाहने घसरून अपघात होत आहेत. येथील वाहतूक पोलिसांनाही वाहतूक नियंत्रित करताना त्रास होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला कल्पना देऊनही कामे होत नाही. तसेच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचा आरोप अतुल गोसराणी यांनी केला आहे.
स्टेम प्राधिकरणाशी संपर्क साधला असता त्यांनी २४ इंची तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागली असल्याचे कबूल केले. मेट्रोची कामे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही पाइपलाइन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असून त्याचे लवकरच काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.