गळती जोरात... पाणी, मीटरचोरी जोमात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:09 AM2019-01-28T01:09:20+5:302019-01-28T01:09:48+5:30
पावसाने वेळेआधीच एक्झिट घेतल्याने संपूर्ण राज्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.
- प्रशांत माने
पावसाने वेळेआधीच एक्झिट घेतल्याने संपूर्ण राज्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. या धर्तीवर पाणीकपात राबविली जात असली तरी गळतीच्या माध्यमातून पाण्याची होणारी नासाडी आणि पाणी चोरीवर अंकुश आणण्यात येत असलेले अपयश पाहता पुढीलकाळात पाणीबाणी लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात पाणीपुरवठा वितरणातील असमतोलपणामुळे पाणी कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना ज्या जलकुंभातून पाणी दिले जाते तेही सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब कल्याण डोंबिवली क्षेत्रात पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंब्रा, औरंगाबादहून जेरबंद केलेल्या इसिसच्या संशयितांकडून राज्यातील जलसाठयांत विषारी रसायने मिसळून घातपात घडविण्याचा कट नुकताच उघडकीस आल्याने जलकुंभांची सुरक्षा चिंतेची बाब बनली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कल्याण व डोंबिवली शहर, टिटवाळा व शहाडचा औद्योगिक परिसर तसेच जून २०१५ मध्ये समाविष्ट झालेल्या २७ गावांचा भाग येतो. आधी केडीएमसीचा परिसर हा ६७.६५ चौरस किलोमीटर क्षेत्रात विखुरलेला होता. परंतु २७ गावांचा समावेश झाल्यावर महापालिका क्षेत्र वाढून आता ११६.०८ चौरस किलोमीटरपर्यंत आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १२ लाख ४७ हजार इतकी लोकसंख्या होती परंतु २७ गावांच्या समावेशामुळे ही लोकसंख्या आता १५ लाख १८ हजार ७६२ च्या आसपास पोहचली आहे. केडीएमसी क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा आढावा घेता सरासरी किमान १९०० मिलीमीटर ते कमाल २७०० मिलीमीटर च्या दरम्यान पाऊस होतो. पावसाळयाचा हंगाम साधारणपणे ८० ते ९० दिवसांचा असतो. येथे पडणाºया एकूण पावसाच्या सुमारे ७५ टक्के पाऊस जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये होतो. याठिकाणी वार्षिक सरासरी सुमारे २३०० मिलीमीटर पाऊस पडतो. कल्याण- डोंबिवलीचे वेगाने होत असलेले शहरीकरण तसेच वाढती लोकसंख्या व नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमुळे उपलब्ध साधनांचा काळजीपूर्वक व दूरदृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. बदलत्या काळानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे असे नेहमी सांगितले जाते. परंतु शहरांना पाणीपुरवठा वितरीत करणाºया यंत्रणा याची कितपत प्रभावीपणे अमलबजावणी करतात हा संशोधनाचा विषय आहे. उल्हास व काळू नदी या दोन नद्यांनी कल्याण डोंबिवली या शहरांची पाण्याची गरज भागविली जाते. राज्य सरकारच्या लघु पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला २३८ दशलक्ष लिटर प्रतिदीन पाणी कोटा मंजूर असून सध्या यासह अन्य प्राधिकरणांच्या माध्यमातून केडीएमसी महापालिका क्षेत्रासाठी ३१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
केडीएमसीची बारावे, टिटवाळा, मोहिली, नेतीवली अशी चार जलशुध्दीकरण केंद्र आहेत. या केंद्रांसाठी उल्हासनदी, काळू नदीतून पाणी उचलले जाते. तर २७ गावांसाठी ३५ दशलक्ष लिटर रोज पाणीपुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडीसी) या प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढतच चालली असून २०२१ पर्यंत ३१८ दशलक्ष लिटर तर पुढे २०४१ पर्यंत वाढलेली लोकसंख्या पाहता भविष्यात ही मागणी ५३८ दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात जलकुंभ आणि संप व पंपगृहाची संख्या ७८ च्या आसपास आहे. त्यांची पाणी साठविण्याची ९२.११ दशलक्ष लिटर आहे. त्यात जेएनएनयूआरएम अंतर्गत केडीएमसीने २३ नवीन जलकुंभ बांधण्याचे काम पूर्ण करून त्याचा वापर सुरू केला आहे. सध्याची पाणीपुरवठयाची मागणी पूर्ण करण्यास ही क्षमता पुरेशी असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, बारवी आणि आंध्र धरणातील झपाटयाने कमी होत असलेला पाणीपुरवठा पाहता लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवडयात ३० तास पाणीकपात करण्याचे आदेश दिले होते. त्याची अमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीने महिन्याच्या चौथ्या शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आठवडयाच्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच एक जानेवारीपासून महिन्याच्या चौथ्या शनिवारी पाणी बंद ठेवले जात आहे. धरणातील पाणीसाठयाचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्याच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीत आधीपासूनच २२ टक्के पाणीकपात लागू होती. तेव्हा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असायचा. ही कपात २४ तास लागू होती. परंतु लघुपाटबंधारे विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार ही कपात आता सहा तासांनी वाढविण्यात आल्याने आता चौथ्या शनिवारी पाणी बंद ठेवण्याच्या निर्णय घेऊन तशी अंमलबजावणी सुरू केली आहे.
एमआयडीसीने सलग ३० तास कपात लागू केली आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. संबंधित प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा दर शुक्रवारी बंद असतो, परंतु ३० तासांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गुरूवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ अशी कपात केली जाते. आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बोंब नेहमीच ग्रामीण भागातून होत असताना आता सलग ३० तासांच्या पाणीकपातीमुळे पाण्याचे नियोजन पूर्णत: कोलमडण्याची भीती व्यक्त होत असून एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाई ‘जैसे थे’ राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे एकीकडे पाणी कपात लादून पाण्याचे नियोजन करण्याचा खटाटोप दाखविला जात असलातरी दुसरीकडे मात्र पाणीगळती आणि पाणीचोरीकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता पाण्याची नासाडी थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. केडीएमसी परिक्षेत्रात २१.६५ टक्के तर एमआयडीसी परिसरात हीच गळती १७.२२ टक्के इतकी आहे. जलवाहिन्यांवरील दाब कमी जास्त होत असल्यामुळे व्हॉल्व तसेच जलवाहिनीच्या जोडणीतून गळती होत असल्याचे कारण पुढे करत तत्काळ दुरूस्तीचा दावाही दोन्ही प्राधिकरणांकडून केला जात आहे.
दुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीवर
27 गावांमध्ये आम्ही फक्त पाणीपुरवठा करतो, परंतु गळती होत असेलतर जलवाहिन्यांची दुरूस्ती तसेच ती बदलण्याचे काम केडीएमसीचे असल्याचे सांगत एमआयडीसी जबाबदारीतून हात झटकताना दिसते तर दुसरीकडे जुन्या आणि जीर्ण वाहिन्यांमुळे पाणी गळती होत असून लवकरच त्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे केडीएमसीकडून सांगितले जात आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ही गळती अहोरात्र सुरू असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.
पाणीचोरांना अभय कशासाठी?
डोंबिवलीतील खंबाळपाडा रोड, गोळवली, पत्रीपूल परिसर पाहता हे चित्र दिसून येते. कल्याणमध्येही काही ठिकाणी हे वास्तव पाहवयास मिळते. बेकायदा बांधकामांना एकीकडे जोडण्या सर्रासपणे दिली जात असताना दुसरीकडे सर्व्हीस सेंटर आणि ढाबाचालकांच्या माध्यमातून हजारो लिटर पाण्याची चोरी सुरू असल्याचे दिसत आहे.
काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान तब्बल १५ सर्व्हीस सेंटर आहेत. बेकायदा बांधकामे तसेच पाणी चोरीकडे केडीएमसीचे दुर्लक्ष होत असताना सर्व्हीस सेंटर, बेकायदा हॉटेल, ढाबे, चाळीची बांधकामे, वीटभट्टयांना एमआयडीसीकडून अभय का? ही वारेमाप सुरू असलेली उधळपट्टी थांबणार तरी कधी? असे सवाल उपस्थित होत आहेत.