हल्ली गाणे शिकणे हे अवघड नाही - सुदेश भोसले
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 6, 2022 06:01 PM2022-10-06T18:01:56+5:302022-10-06T18:02:40+5:30
हल्ली गाणे शिकणे हे अवघड नाही. पूर्वी गुरू शोधावा लागत होता. तुम्ही चांगले गात असाल तर तुमची गायकी घराण्यापुरती मर्यादित ठेवू नका.
ठाणे :
हल्ली गाणे शिकणे हे अवघड नाही. पूर्वी गुरू शोधावा लागत होता. तुम्ही चांगले गात असाल तर तुमची गायकी घराण्यापुरती मर्यादित ठेवू नका. एकदा स्टेज फिअर गेले की अर्धी लढाई जिंकलात. गाणे पाठांतर करा, असा कानमंत्र सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला.
मराठी ग्रंथ संग्रहालयात मॅजेस्टीक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पांचे पाचवे आणि शेवटचे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी भोसले यांना पत्रकार विशाल पाटील यांनी बोलते केले.
करिअरच्या काळात नैराश्य आल्याचे सांगताना भोसले म्हणाले की, नैराश्येचा घाव मोठा असतो. त्या काळात कुटुंबाची साथ महत्त्वाची असते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी यातून मला दहा दिवसांत बाहेर काढले. नैराश्य आले तर ते दाबून ठेवू नका, इतरांसोबत बोला, अन्यथा त्याचे परिणाम आत्महत्येपर्यंत जातात, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी त्यांचा पेंटिंग ते गायनचा प्रवास उलगडला. अमिताभ बच्चन ते शत्रुघ्न सिन्हांसारख्या अनेक दिग्गजांच्या आवाजात त्यांनी चित्रपटांचे संवाद तर किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, मोहम्मद रफी, आर.डी बर्मन यांच्या आवाजात त्यांची गाजलेली गाणीदेखील सादर केली.
बच्चन यांची पाच ते सहा गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यांचा आजही वाढदिवसाला १२ वाजता फोन येतो. ते पुढे म्हणाले, मंगेशकर कुुटुंबासोबत ८५-८६ सालापासून काम करत आहे. मेरे साथ जब भोसले होते है तब मुझे और किसीकी जरुरत नही पडती, असे कौतुकोद्गार लता मंगेशकर यांनी कॅनडात काढले असल्याची आठवण त्यांनी सांगितली. आशा भोसले यांच्यामुळे अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांनी सादर केलेल्या मिमिक्रींना प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.