सुटीचा निरोप देण्यात ‘लेटमार्क’, विद्यार्थी-पालकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:47 AM2018-07-11T01:47:19+5:302018-07-11T01:47:33+5:30
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला.
ठाणे - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला. यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिप शाळांना निरोप गेला असला तरी शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी कुणीच घेतली नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. यामुळे यास जबाबदार कोण असा प्रश्न आता करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टीचा अंदाज नव्हता का, हवामान खात्याने १५ जुलैपर्यंत मुंबईसह ठाणे-रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दिलेला इशारा जिल्हा प्रशासनाला माहीत नव्हता का, सुटी जाहिर केल्यानंतर तिचा निरोप खासगी शाळांपर्यंत न पोहचल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक शाळांचा सकाळचे सोडाच दुपारचे सत्र सुरू झाले तरी सुटीचा निरोप न पोहचल्याने त्यांचा सुटी घोळ झाला.
दरम्यान, जिल्ह्यात संततधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याबाबत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी पालक शिक्षक संघ स्थानिक शाळा समितीच्या मदतीने उपाययोजना कराव्या, तसेच कोणीही मुख्यालय सोडू नये अशी तंबी शिक्षण विभागाने दिली. आपत्कालीन बाबींसाठी तालुका वा शहराच्या आपत्कालीन कक्षाच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले. अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे मंगळवारी सकाळी उशिरा आदेश जारी केले. सुटीचा संदेश विद्यार्थ्यांना तत्काळ पोहचविण्यासाठी शाळांनी ग्रामस्थ, पालकांशी लगेचच संपर्क करावा. सर्व शिक्षक वेळेत शाळेत जातील व शाळेत कुणी विद्यार्थी आलेले नाहीत वा विद्यार्थी आले तर त्यांना सुखरूप घरी पोहचवून तशी खात्री करतील, आजचा शालेय कामकाजाचा दिवस पुढील काळात भरण्यात यावा, मंगळवारी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्रप्रमुखांकडे देण्याच्या सूचना आहेत.
केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांचा आढावा घेऊन शिक्षण विभागाकडे रिपोर्ट करावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी मुख्यालय सोडू नये आदी सूचना शिक्षण विभागाने तडकाफडकी जाहीर करून सुटी जाहीर केली.