गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:07 AM2019-06-19T01:07:18+5:302019-06-19T01:07:30+5:30
कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाहतूक महिनाभरापासून विलंबाने धावत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयात लेटमार्क लागत असल्याने वेतनात कपात होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गर्दीच्या वेळेत डोंबिवली आणि कल्याणहून विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी मनसेच्या डोंबिवली शिष्टमंडळाने स्थानक प्रबंधक के. ओ. अब्राहम यांच्याकडे मंगळवारी केली.
मनसेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसदर्भात स्थानक प्रबंधकांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत गर्दीचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. तसेच डोंबिवलीत विशेष अधिकारी नेमून त्याच्याद्वारे परिस्थिती नियंत्रणात येईल, याची काळजी घ्यावी, अशी मागणी मनसेने केली. स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवासी आणि पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे पादचारी मधल्या पुलाचा वापर करत आहेत. मात्र, टीसींनी त्यांना अडवू नये. तसेच कल्याण दिशेकडील पुलाची तातडीने दुरुस्ती करून तो प्रवाशांसाठी खुला करावा, अशीही मागणी करण्यात आली. लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा न झाल्यास आणि विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास मनसेचे शिष्टमंडळ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेईल, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, या शिष्टमंडळात मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा सचिव निलेश भोसले, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे आदी उपस्थित होते.