‘त्यांना’ २१ दिवसांची भर पगारी रजा
By admin | Published: November 2, 2015 01:26 AM2015-11-02T01:26:36+5:302015-11-02T01:26:36+5:30
गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यांना आता २१ दिवसांची भर पगारी रजा देण्याचा
ठाणे : गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यांना आता २१ दिवसांची भर पगारी रजा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार उप आयुक्त ठाणे कार्यालयाने दिला आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी ठाणे महापालिकेला दिले आहेत.
ठाणे महापालिकेत कळवा हॉस्पीटल, रस्ते सफाई, घंटागाडी आदींसह इतर ठिकाणी काम करणाऱ्या २५०० कामगारांना आता याचा लाभ मिळणार आहे. प्रारंभी पालिकेने यातून हात वर करून ही जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे सांगितले होते. अखेर या संदर्भात म्युनिसिपल लेबर युनिनने कामगार उप आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता २६ आॅक्टोबर रोजी त्यांनी हे आदेश दिले आहेत. यानुसार २१ दिवसांची भर पगारी रजा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच यापूर्वीच्या तीन वर्षाची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले.
या शिवाय, २६ जानेवारी, १ मे, १५ आॅगस्ट आदी सार्वजनिक सुट्यांचे पगारही देण्यात यावेत असेही सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदाराने दिला नसेल तर त्यासंदर्भातील जी काही थकबाकी असेल ती पालिकेने द्यावी आणि नंतर कंत्राटदाराच्या बिलातून ही रक्कम वर्ग करावी असे आदेशात म्हटले असल्याची माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली.
(प्रतिनिधी)