थर्टी फर्स्टला हँगओव्हर झालेल्यांना घरी सोडा, पोलिसांचा हॉटेल चालकांना सल्ला
By जितेंद्र कालेकर | Published: December 27, 2023 09:15 PM2023-12-27T21:15:24+5:302023-12-27T21:15:52+5:30
नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार आहे.
ठाणे: थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेला ग्राहक जर अति मद्यधुंद झाला किंवा तो हँगओव्हर झाल्यास त्याला शक्यतो, घरी सोडविण्यासाठी तुमच्याकडे चालक ठेवा, खासगी वाहन चालकांचे क्रमांकही उपलब्ध ठेवा, असा महत्त्वपूर्ण सल्ला ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिला आहे. ठाण्यातील हॉटेल चालकांनीही पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार आहे. परंतु, अपघात टाळण्यासाठी कोणी जर अति मद्यधुंद झालाच तर त्याला तशा अवस्थेमध्ये वाहन चालविण्यास अटकाव करा. तुमच्याकडे पाच ते सहा अतिरिक्त वाहनचालक उपलब्ध ठेवा. गरज पडलीच तर खासगी कारचालकांचे मोबाइल क्रमांक ठेवून तशी वेगळी उपलब्धताही ठेवा. एखाद्याने मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास स्वत:बरोबरच रस्त्यावरील प्रत्येकासाठी ते धोकायदायक ठरते.
त्यामुळे अशा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांनी उपाययोजना करणे हे हॉटेल चालकांचेही कर्तव्य असल्याचे महत्त्व उपायुक्त राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या हॉटेल चालकांबरोबरच्या बैठकीत पटवून दिले. यावेळी ठाणे शहरातील ३५ हॉटेल चालक, सहायक पोलिस आयुक्त कवयित्री गावित तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.