कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख नको मला; रामदास भटकळ यांची मिश्किल प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:52 PM2024-02-27T21:52:01+5:302024-02-27T21:53:54+5:30
Lokmat Sahitya Mahotsav 2024: ७० व्या वर्षी केलेली पीएचडी, ग्रेस यांच्याशी असलेली मैत्री यांसह अनेक आठवणी, किस्से रामदास भटकळ यांनी लोकमत सोहळ्यातील मुलाखतीत सांगितल्या.
Lokmat Sahitya Mahotsav 2024:लोकमत साहित्य महोत्सव २०२४ च्या सांगता सोहळ्यात कथा, कादंबरी, कविता, चरित्र, वैचारिक, अनुवाद अशा विविध क्षेत्रांत आपल्या लेखनाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या लेखक, कवी आणि पुस्तकांचा देखणा गौरव सोहळा ठाणे येथे झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांना लोकमत साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर, ज्येष्ठ गीतकार स्वानंद किरकिरे, अभिनेता-कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
किशोर कदम यांनी रामदास भटकळ यांची मुलाखत घेतली. अनेक किस्से, प्रसंग, आठवणी यांनी या गप्पा अधिक रंगतदार झाल्या. रामदास भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांना कसे शोधून काढले, यांपासून ते देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या पीएचडीपर्यंतचे अनेक किस्से आणि आठवणी सांगत याची मेजवानी रसिकांना दिली. या मुलाखतीत किशोर कदम यांनी एक जाहीर कबुली दिली. यावर, कवींना खोटे बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख मला नको, अशी मिश्किल प्रतिक्रिया रामदास भटकळ यांनी केली.
कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख नको मला
किशोर कदमच्या कविता वाचन ऐकून मी धुंदीत गेलो. मी तेव्हा निवृत्त झालो होतो. मी कोणताही निर्णय घेणार नाही, असे ठरवले होते. मात्र, माझ्या सहकाऱ्यांना सांगून हे काम केले असते तर वेळ गेला असता. त्यामुळे मी ठरवले आणि निवृत्त असूनही किशोरला पत्र लिहिले आणि ते पुस्तक छापले, असे रामदास भटकळ यांनी सांगितले. यानंतर हे पुस्तक मी आधीच एका प्रकाशकांकडे दिले होते. मात्र, तुमचा प्रेमळ दबाव माझ्यावर होता. त्यामुळे खोटे बोलून ते पुस्तक त्या प्रकाशकांकडून काढून घेतले आणि तुम्हाला दिले. ते पुस्तक ग्रंथालीला दिले होते. त्यांची माफी मागतो. ही जाहीर कबुली या प्रसंगी देतो, असे किशोर कदम यांनी सांगितले. यावर कवींना खोटे बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख नकोय मला, अशी मिश्किल प्रतिक्रिया रामदास भटकळ यांनी दिली.
७० व्या वर्षी पीएचडी केली
महात्मा गांधींच्या सगळ्या गोष्टी मान्य होणे कठीण आहे. महात्मा गांधी पंचिंग बॅग आहेत, असे मला नेहमी वाटते. कारण कोणीही यावे आणि मारून जावे. त्यांचे विरोधक असो वा समर्थक. प्रशांत जोग यांची एक मुलाखत पाहत होतो. तेव्हा ते म्हणाले की, गांधी वाचताना तुम्हाला पटले नाही, तर समजा तुमची बुद्धी वाढलेली नाही. गांधी हा सर्वंकश विचार आहे. गांधींच्या प्रत्येक गोष्टीला अनेक कारणे आहेत. त्यामुळे प्रबंधांसाठी मी अनेक विषय निवडले होते. तेव्हा मी ७० वर्षांचा होतो. निवृत्त झालो होतो. तेव्हा गांधियन उषा मेहता यांच्या सल्ल्याने गांधी विषयावर पीएचडी करायची ठरवली. माझा विषय होता की, गांधी आणि विरोधक. यावर, उषा मेहता म्हणाल्या की, टिळकांपासून नेहरूंपर्यंत सगळ्यांना विरोधक मानायला लागलास, तर विरोधकाचा एकच मुद्दा त्यात येईल. खोलात जाता येणार नाही. त्यामुळे एक कुणीतरी निवड. मग मी सावरकर आणि आंबेडकर यांची निवड केली. त्याला अनेक कारणे आहेत. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जातीयवाद आणि धार्मिक विचार हे अजूनही आपल्याला सतावत आहेत. त्यादृष्टिने त्यांना अधिक महत्त्व आहे, असे मला वाटले. त्यामुळे प्रबंधासाठी तसा विषय निवडला आणि ७० व्या वर्षी पीएचडी केली, असे रामदास भटकळ यांनी सांगितले.
ग्रेस आणि रामदास भटकळ यांचा किस्सा
ग्रेस नाव एका भूमिकेचे होते. ती भूमिका इंग्रिड बर्मनने साकारली होती. त्यामुळे टोपण नाव म्हणून ग्रेस हे नाव घेतले होते, असे किशोर कदम यांनी सांगत, ग्रेस यांच्याबाबतचा अनुभव रामदास भटकळ यांना विचारला. तसेच त्यांची सही ग्रेस यांच्यासाठी आणली होती, ती कशी, याबाबत सांगण्याची विनंती केली. एका कारणासाठी मी अमेरिकेत जाणार होतो. तेव्हा ग्रेस यांचे पत्र आले. तुम्ही तिथे जाणार आहात, तर तुम्हाला अमेरिकेत इंग्रिड बर्मन भेटली तर तिला सांगा आणि मला तिची सही आणून द्या, असे त्या पत्रात ग्रेस यांनी सांगितले होते. पुढे मी अमेरिकेला हॉलिवूडमध्ये गेलो. तिथे मला समजले की, त्या अभिनेत्रीने कधीच ठरवले की अमेरिकेला यायचे नाही. मग पुढे मी लंडनला गेलो तेव्हा कळले की तिकडच्या नाटकात काम करते. पण मला वेळ नव्हता. मी अस्वस्थ झालो. माझ्या मित्रासाठी (ग्रेससाठी) मला सही आणायची होती. म्हणून मी त्या अभिनेत्रीला पत्र लिहिले. तिने ते पत्र व्यवस्थित वाचले. पुढे माझी मैत्रीण तारा वनारसे यांना त्या अभिनेत्रीने फोन केला. मी तिच्या नाटकाच्या प्रयोगाला गेलो. आणि ती अभिनेत्री मला भेटली. आणि तिने फोटोवर सही दिली. अशा प्रकारे ती सही मी मिळवली. परत आल्यावर माझी बायको म्हणाली की, ओरोजिनल आपल्याकडे ठेवू आणि कॉपी ग्रेसला देऊ. पण मी म्हणालो नाही. ते त्याचे आहे तर ते त्यालाच देणार. त्यावरून ग्रेस आणि माझी मैत्री घट्ट झाली, अशी एक आठवण रामदास भटकळ यांनी सांगितली.
दरम्यान, ना. धों. महानोर यांच्यासह स्वतः गायन-संगीतविषयक प्रवास आणि विविध आठवणी रामदास भटकळ यांनी सांगितल्या. या गप्पांसाठी निवड केल्याबाबत किशोर कदम यांनी रामदास भटकळ यांचे आभार मानले.