कुठलीही बंदुकीची गोळी विचार संपवू शकत नाही; दामोदर मावजो यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:50 AM2022-10-02T09:50:30+5:302022-10-02T09:51:07+5:30
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव होते, मला संरक्षण देण्यात आले; पण...; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो स्पष्टच बोलले...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून कळले व मला संरक्षण देण्यात आले; पण लेखक म्हणून मला संरक्षण नकोय. कारण, त्यामुळे माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते. चार वर्षे झाली माझ्यावर अजून गोळी झाडली गेलेली नाही. मात्र, कुठलीही बंदुकीची गोळी माझा विचार संपवू शकत नाही, असे परखड वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो यांनी शनिवारी केले.
मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे या ग्रंथदालनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनास शनिवारपासून सुरुवात झाली. त्याचे पहिले पुष्प मावजो यांनी गुंफले. निर्माते जयप्रद देसाई यांनी त्यांना बोलते केले. मुलाखतीत त्यांनी वरील मत व्यक्त केले. मावजो म्हणाले की, साहित्यिकांनी राजकारण करू नये हा भूमिकेला माझा विरोध आहे. साहित्यिकांनी जरूर राजकारण करावे; पण पक्षाचे राजकारण करू नये. मी निर्भिडपणे, पण जबाबदारीने बोलतो म्हणून काही लोकांना मी आवडत नाही. आम्ही प्रामाणिकपणे बोलतो आणि म्हणूनच बोलण्याला नकळत धार येते. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर माझे नाव हिटलिस्टवर आले. खरं तर गोव्यात माझा एकही शत्रू नाही. माझ्या मतांना विरोध करणारे आहेत; पण मला वैयक्तिक विरोध करणारे नाहीत. गुप्तचर यंत्रणेने मला सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकात जाऊ नका, तिथे तुमच्या जिवाला जास्त भीती आहे; पण मी सगळीकडे फिरणार असे सांगितले. त्यानंतर मी कर्नाटकात गेलो. आज महाराष्ट्रात आलो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"