विधानसभेचे पडसाद केडीएमसीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:31 AM2019-10-26T01:31:09+5:302019-10-26T01:31:13+5:30

गटबाजी, दगाफटका टाळण्यासाठी करावी लागणार कसरत

Legislative Assembly Position in KDMC | विधानसभेचे पडसाद केडीएमसीत

विधानसभेचे पडसाद केडीएमसीत

Next

कल्याण : विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी कल्याण-डोंबिवलीत शिवसेना व भाजपमध्ये झालेली रस्सीखेच, अंतर्गत वादामुळे नाराजी तसेच बंडखोरीचे लागलेले ग्रहण यामुळे कल्याण ग्रामीणसारखा मतदारसंघ महायुतीला गमवावा लागला आहे. दुसरीकडे एकंदरीतच येथील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा कौल पाहता याचे पडसाद पुढील वर्षात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत युती आणि आघाडी कायम राहते का, यावरही लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघात विश्वनाथ भोईर (शिवसेना), कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड (भाजप), कल्याण ग्रामीणमध्ये प्रमोद पाटील (मनसे) आणि डोंबिवलीत रवींद्र चव्हाण (भाजप) हे निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून युती असो अथवा आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळाली. या स्पर्धेतून शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत नाराजी कमालीची पाहायला मिळाली. मात्र, तेवढी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये दिसली नाही. या संघर्षाचे परिणाम कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीणमध्ये दिसून आले.

कल्याण पश्चिम या नव्याने पदरात पाडून घेतलेल्या मतदारसंघात शिवसेनेला भाजपच्या नरेंद्र पवार यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले. तर, पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांच्यापुढे बहुतांश शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोर म्हणून आव्हान उभे केले. बंडखोरांना थारा दिला जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले गेले. परंतु, कारवाई झाली नाही. त्यामुळे बंडखोरीला नेत्यांचीच फूस होती, हे स्पष्ट आहे.

पूर्वेत शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक गायकवाड यांच्याविरोधात प्रचार करताना दिसले, तसे पश्चिमेतही भाजपचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी बंडखोर अपक्ष उमेदवार पवार यांचा उघडपणे प्रचार करण्यासाठी उतरले होते. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ अबाधित राखण्यात महायुतीला यश आले असून, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत.

पूर्वमध्ये झालेली बंडखोरी पाहता कल्याण ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा प्रचार केल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फटकाही ग्रामीणमधील शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना बसल्याचे बोलले जाते. यात कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ दुसºयांदा पटकाविण्यात मनसेला यश आले आहे. या मतदारसंघात मनसेची मते मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. तर, डोंबिवली मतदारसंघात पुन्हा भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली असली तरी येथेही मनसेची मते वाढली आहेत, तर चव्हाण यांचे मागील मताधिक्य कमी झाले आहे.

एकूणच या निवडणुकीतील घडामोडींचे पडसाद आता केडीएमसीच्या निवडणुकीतही उमटतील, यात शंका नाही. २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ५३, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १ आणि एमआयएम १ तसेच ९ अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्भवलेले वाद आणि नाराजी पाहता हे चित्र महापालिकेच्या निवडणुकीतही कायम राहील आणि कल्याण-डोंबिवलीकरांना बिनपैशांचा तमाशा पुन्हा पाहायला मिळेल, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

२७ गावे, नागरी समस्या मुद्दे गाजणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीची मागील निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली होती. ‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजतो दात, जात ही आमची’ या गर्जनेसह कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी सहा हजार ५०० कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली होती.

परंतु, त्या कोट्यवधी रुपयांचा मुद्दा गेली पाच वर्षे चांगलाच गाजत आहे. पण, आराखडा काही पाहायला मिळाला नाही. २७ गावे महापालिकेतून वगळण्याचा मुद्दाही कागदावरच आहे. आता महापालिकेच्या पुढील निवडणुकीतही नागरी समस्यांसह हे मुद्दे चांगलेच गाजणार, यात शंका नाही.

Web Title: Legislative Assembly Position in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.