बाजारपेठेपासून सोशल मीडियापर्यंतच्या चर्चेत लिंबूचाच वरचष्मा; एक लिंबू चक्क १५ रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:48 PM2022-04-18T16:48:53+5:302022-04-18T16:50:02+5:30
ठाणे : सध्या बाजारपेेठेपासून सोशल मीडियावर लिंबूचीच चर्चा रंगली आहे. यंदा लिंबूने भाववाढीचा रेकॉर्ड ब्रेक केल्याने बाजारपेठेत लिंबूच्या दराबाबत ...
ठाणे : सध्या बाजारपेेठेपासून सोशल मीडियावर लिंबूचीच चर्चा रंगली आहे. यंदा लिंबूने भाववाढीचा रेकॉर्ड ब्रेक केल्याने बाजारपेठेत लिंबूच्या दराबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावर महागड्या लिंबूवर विनोद केले जात आहेत. सध्या ठाण्याच्या बाजारपेठेत १० ते १५ रुपयाला एक लिंबू मिळत असल्याने केवळ उच्चभ्रू ठाणेकरांकडून लिंबू खरेदी होत आहे. सर्वसामान्यांनी मात्र लिंबूच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
लिंबूचे दर गगनाला भिडले असल्याने सध्या लिंबूची जोरदार चर्चा सुरू आहे. लिंबू महागला तरी हाॅटेल्स, पोळी भाजी केंद्र, उपाहारगृहांकडून लिंबूची खरेदी सुरू आहे. ठाण्यातील उच्चभ्रू वस्तींमध्येही लिंबूची खरेदी होत आहे. मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर लिंबूचे दर गेल्याने त्यांनी पाठ फिरवल्याची माहिती भाजीविक्रेते उमेश जयस्वाल यांनी दिली. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या दिवसांत लिंबू सरबत पिण्याचे प्रमाण वाढते. परंतु यावर्षी लिंबाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने सोशल मीडियावर विनोदाच्या माध्यमातून लिंबूची जोरदार चर्चा रंगली आहे.
जांभळी मार्केटमध्ये लहान लिंबू सात, तर मोठा लिंबू दहा रुपयांना मिळत आहे, गावदेवी मार्केटमध्ये लहान लिंबू १० तर मोठा लिंबू १५ रुपयांना मिळत आहे. लिंबूची आवक घटल्यामुळे दर गगनाला भिडत आहेत. लिंबाची मागणी वाढली असली तरी, पुरवठा कमी असल्याने लिंबू महागला आहे, असे भाजीविक्रेत्या सीमा शेलार यांनी सांगितले. लिंबू सध्या मद्रास आणि पुणे येथून येत आहेत.
लिंबाची खरेदी कमी झाल्याने काही भाजी विक्रेते फक्त शनिवार, रविवारीच लिंबू विक्रीला आणतात. इतर दिवशी लिंबू विक्रीला आणल्यास त्याची खरेदी जास्त होत नाही. ते तसेच पडून राहतात, असे भाजी विक्रेते संभाजी खेडेकर यांनी सांगितले.
लिंबू मिरची आता २० रुपयांना
अनेकजण घराच्या दाराला, तर काही जण त्यांच्या दुकानाला लिंबू-मिरची टांगतात. या लिंबू-मिरचीचे दरदेखील वाढले आहेत. पाच रुपयाला मिळणारी लिंबू-मिरची आता २० रुपयाला मिळत आहे.