बाजारात मे महिन्यातही लिंबूचे दर वाढलेलेच; मिरची मात्र स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 10:24 PM2022-05-07T22:24:00+5:302022-05-07T22:25:01+5:30
ठाणे : उन्हाळ्याच्या सुरुवातीला लिंबाचे दर वाढू लागतात आणि एप्रिल, मे महिना आला की कमी होतात. त्यामुळे मे महिन्यात ...
ठाणे : उन्हाळ्याच्या सुरुवातीला लिंबाचे दर वाढू लागतात आणि एप्रिल, मे महिना आला की कमी होतात. त्यामुळे मे महिन्यात लिंबूचे दर कमी होतील, असे वाटत असताना अद्यापही दर मात्र तेच आहेत. लिंबू या महिन्यातही १० रुपये प्रतिनग मिळत आहे. लिंबाची आवक अद्यापही कमी असल्याने दर कमी झालेले नाहीत. जूनपर्यंत हेच दर राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.
यंदा तापमान ४५ अंशांच्या आसपास गेल्याने लिंबूच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. मागणी जास्त, परंतु पुरवठा कमी अशी सध्या बाजारात परिस्थिती आहे. लिंबूच्या मागणीत वाढ झाली की दरात वाढ होते. परंतुु, एप्रिल महिना सुरू झाला की, लिंबाचे दर कमी व्हायला सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाचा फटका लिंबाच्या उत्पादनाला बसला आणि दराने उच्चांक गाठला. लिंबू दहा रुपयांवर जाऊन पोहोचले. लिंबाचे दर मे महिन्यात कमी होतील, ही आशाही फोल ठरली आहे. लिंबू अद्याप दहा रुपये प्रतिनग बाजारात मिळत आहे. पहिल्यांदाच लिंबूचे दर सलग दोन ते तीन महिने वाढलेले आहेत. दरवर्षी दर कमी होत जातात. होलसेल बाजारात लिंबूचे दर कधीही पाच रुपयांच्या वर गेले नव्हते. परंतु, आता होलसेलमध्येच लिंबू आठ रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती लिंबू विक्रेते गणेश कल्याणी यांनी दिली.
लिंबू होलसेल दर (प्रती नग) : ३ ते ८ रुपये, किरकोळ दर : ५ - १० रुपये
इथून होते आवक
आठ महिने लिंबूची आवक नगर जिल्ह्यातून होते आणि तीन महिने ही मद्रास येथून होत असते. मार्च ते मे या महिन्यांत मद्रासचा लिंबू येत असतो. परंतु, त्या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम लिंबाच्या उत्पादनावर झाल्याने दर वाढलेले आहेत. नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिंबाची आवक सुरू झाली की, दर खाली येतील, असे लिंबू विक्रेते गणेश कल्याणी यांनी सांगितले.
लिंबूचे दर वाढलेलेच असल्याने दुसरीकडे मिरची स्वस्त झाली आहे. मधल्या काळात हिरव्या मिरचीने शंभरी गाठली होती. १२० रुपये प्रतिकिलोने मिरची मिळत होती. आता मिरची होलसेल बाजारात ६४ रु. किलो, तर किरकोळ बाजारात ८० रु. किलोने मिळत असल्याचे भाजी विक्रेते उमेश जयस्वाल यांनी सांगितले.