Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:16 PM2022-08-23T17:16:29+5:302022-08-23T17:17:49+5:30
निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला.
ठाणे - मानवी वस्तीत बिबट्या आढळून येण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढल्याचं दिसून येत आहे. माणसांच्या घराजवळ, शेतात, वस्तीत बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. आता, शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावात लहु नारायण निमसे यांच्या राहते घरी सोमवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. त्यावेळी, लहु निमसे यांनी प्रसंगावधानता दाखवल्याने बिबट्याल जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. मात्र, त्यासाठी 7 तासांची कसरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावी लागली.
निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्य मधुकर लहु निमसे यांना जाग आली. बाजुच्याच घरात त्यांचा मुलगा झोपला होता. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्या शिरलेल्या रुमचा दरवाजा कडी लावून घेतला. त्यानंतर, तात्काळ वनविभागाला माहिती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यजीव बचाव पथक, वन विभाग आणि पोलिसांची रेस्क्यू टिमने घटनास्थळी पोहोचत बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केला. तब्बल सात तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये वन विभागाला यश आले. दरम्यान, पुढील काही तासात डॉक्टरांकडे तपासणी करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.