बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेली दुकली गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:06 PM2018-07-11T21:06:44+5:302018-07-12T16:17:23+5:30
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
ठाणे - दहा लाखात बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईतील दुकलीला ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष १च्या पथकाने अटक केली आहे. दीपक थापा (वय - 20) या मुंबईतील कामाठीपुरात राहणारी आणि त्याचा 16 वर्षीय अल्पवयीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे व दुचाकी असा 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई काल सायंकाळी केली असून याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईतील कामाठीपुरा येथे राहणारा थापा हा बेरोजगार असून मंगळवारी सायंकाळी आपल्या साथीदारासोबत दुचाकीवरून ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोर बिबट्याचे सोलून काढलेले कातडे 10 लाखात विकण्यासाठी आला होता. त्यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचून दोघानांही अटक करून बिबट्याचे कातडे हस्तगत केले. थापाचा साथीदार अल्पवयीन असून त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.