बिबट्याच्या कातडीची तस्करी; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:00 AM2019-05-28T06:00:00+5:302019-05-28T06:00:13+5:30
राजेश अरोरा (४४, रा. मुलुंड, मुंबई) आणि मोजीस ऊर्फ मोजा आगीमणी (३०, रा. तुमरी कप्पा, धारवाड, जि. कलकडगी, कर्नाटक) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडेही जप्त केले आहे.
ठाणे : बिबट्याच्या कातडीची ठाण्यात १८ लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या राजेश अरोरा (४४, रा. मुलुंड, मुंबई) आणि मोजीस ऊर्फ मोजा आगीमणी (३०, रा. तुमरी कप्पा, धारवाड, जि. कलकडगी, कर्नाटक) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडेही जप्त केले आहे.
वागळे इस्टेट परिसरात दोघेजण बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार आणि हवालदार शशिकांत नागपुरे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज बेंद आदींच्या पथकाने २१ मे रोजी अरोरा आणि अगिमणी या दोघांना ताब्यात घेतले. Þ
अरोराच्या अंगझडतीत हिरव्या रंगाच्या सॅकमधून बिबट्याची सुकवलेली कातडी आढळून आली. चौकशीत ही कातडी तो १८ लाखांमध्ये विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.