बदलापूरच्या आंबेशीव गावात बिबट्याच्या पाऊलखुणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:58 AM2019-06-04T00:58:13+5:302019-06-04T00:58:19+5:30
गायीची केली शिकार : हालचाली कैद करण्याकरिता सीसीटीव्ही बसवले
बदलापूर : बदलापुराजवळील आंबेशीव गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गावातील रामगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ एका गायीची शिकार बिबट्याने केल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले आहेत. वांगणी परिसरातील जंगलात एक बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरा एक बिबट्या आंबेशीवच्या जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश वनविभागाच्या अधिकाºयांनी दिले आहेत.
गेल्या वर्षभरापासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. आधी उल्हासनगर कॅम्प-५ मध्ये बिबट्या आढळला, तर त्याच्यापाठोपाठ चामटोली गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर होता. त्या ठिकाणी बिबट्याने शेळी खाल्ली होती. अंबरनाथ, मलंगगड ते वांगणीच्या ढवळेपाडा भागातील डोंगराळ परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट आहे. दोन बछडे आणि प्रत्येकी एक नर आणि मादी या भागात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. मात्र, या बिबट्यांचे वावरक्षेत्र मोठे असल्याने कधी कोठे बिबट्या दिसेल, याचा नेम राहिलेला नाही. वांगणीजवळील ढवळेपाडा भागात मृत बिबट्या आढळल्यावर बिबट्याच्या जीवितास धोका असल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या उपासमारीने मेल्याची शक्यताही वर्तवली गेली. मात्र, या मृत बिबट्याच्या मृत्यूविषयी संभ्रम असला, तरी इतर बिबटे हे अजूनही जंगलात वावरत असल्याचे लक्षात आले आहे.
बदलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या आंबेशीव गावातील रामगिरी मठाजवळ बिबट्याचा वावर दिसला आहे. या भागातील शेळी आणि वासरांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. एक दिवसआधी बिबट्याने या भागातील एका वासराची शिकार केली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी पाहणी केली. बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने वनविभागाने शिकार केलेल्या वासराचा मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला असून त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या बिबट्याचा वावर हा नैसर्गिक असला तरी बिबट्या गावाच्या हद्दीजवळ आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.