वेढीगावात बिबट्याने वासरु पळवले
By admin | Published: April 19, 2017 12:07 AM2017-04-19T00:07:04+5:302017-04-19T00:07:04+5:30
येथील पश्चिम भागातील गाव पाड्यांच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर वाढल असून मंगळवारी बिबट्याने हल्लाकरून वेढी गावातील वासराचा फडशा पाडला आहे.
सफाळे : येथील पश्चिम भागातील गाव पाड्यांच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर वाढल असून मंगळवारी बिबट्याने हल्लाकरून वेढी गावातील वासराचा फडशा पाडला आहे. आतापर्यंतची गावात शिरुन हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने आतापर्यंत वनविभागाने जागोजागी लावलेले ट्रॉप कॅमेरे काय कामाचे असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने जागोजागी सूचना फलके लावले आहेत. मात्र, बिबट्या पकडण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
पश्चिमेकडील किरईपाडा भवानगड चटाळे, मथाणे, विराथन, आदी भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी किरईपाडा येथे पाण्याच्या स्रोताजवळ बिबट्याच्या लहान व मोठ्या पायांचे ठसे पाहिले होते. यामुळे एक मादी व बछडा बिबट्याचा वावर या भागात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. दोन महिन्यांपासून नागरी वस्तीत अन्नाच्या शोधात आलेल्या बिबट्याने आतापर्यंत नागरिकांवर हल्ला केल्याचे वृत्त नव्हते. मात्र, आज पहाटे वेढी गावातील जितेंद्र म्हात्रे यांच्या घराजवळील गोठ्यातून गाईचे वासरु च त्याने पळवून नेले.
म्हात्रे सकाळीच आपल्या मुलासोबत मुंबईला गेले होते. त्यांची पत्नी प्रीतीजा यांना गोठ्यात वासरू दिसले नाही. शोधाशोध केली असता झाडाझुडपात वासराचे अर्ध शरीर त्यांना आढळले. या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकार्ऱ्यांना दिली. त्यानुसार अधिकायाऱ्यांनी घटनास्थाळाची पाहणी करून सायंकाळी त्यांच्या घराजवळ कॅमेरे बसविले. तर पाण्याचा मुबलक साठा, रानडुक्कर इ. खाद्य उपलब्ध असल्याने बिबट्या सफाळ्याच्या पश्चिम भागात वावर करत असल्याचेही वनविभागाचे अधिकारी डी. बी. देसले यांनी दिली. (वार्ताहर)