कुष्ठरुग्णांचा आजही सुविधांसाठी संघर्ष सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:35 AM2020-03-02T00:35:33+5:302020-03-02T00:35:38+5:30
हनुमाननगर वसाहतीत कुष्ठरुग्णांची वसाहत आहे. याठिकाणी २०० कुटुंबे वास्तव्याला आहेत.
येथील पूर्वेकडील हनुमाननगर वसाहतीत कुष्ठरुग्णांची वसाहत आहे. याठिकाणी २०० कुटुंबे वास्तव्याला आहेत. यातील काही रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सद्यस्थितीला येथील १०७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५९ रूग्णांचे दिव्यांगाचे प्रमाण ४० टक्क्याहून अधिक आहे. अशा कुष्ठरूग्णांना दररोज मलमपट्टी करावी लागते. अन्यथा रूग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाऱ्या जंतुंमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो. कुष्ठरूग्णांची वाढती संख्या पाहता केडीएमसीने १९९३ मध्ये या ठिकाणी महापालिकेतर्फे चालणारा एक स्वतंत्र दवाखाना उभारला. त्याठिकाणी कुष्ठरूग्णांवर उपचार व्हायचे परंतु गेली २५ वर्षे ज्याठिकाणी उपचार सुरू होते त्या दवाखान्याची गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात जीर्ण अवस्थेमुळे पुरती पडझड झाली आहे. त्याची त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा कधीही स्लॅब कोसळून उपचारासाठी आलेल्या रूग्णांना दुखापत होऊ शकते. दरम्यान पडझड झाल्यापासून खबरदारी म्हणून हा दवाखाना बाजूला असलेल्या केडीएमसीच्या राजगुरू विद्यालय या शाळेजवळ असलेल्या सभागृहात हलविण्यात आला आहे. ज्यावेळेस दवाखान्याची पडझड झाली त्यावेळी केडीएमसीसह तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून डागडुजी करण्यास आयुक्तांना पत्र द्यावे अशी विनंती हनुमाननगर कुष्ठ सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली होती. त्यावर चव्हाण यांनी आयुक्तांना ६ फेब्रुवारी २०१९ ला पत्र पाठवून काम तातडीने करण्याबाबत आदेशही दिले होते. परंतु दवाखाना आजही तुटलेल्या अवस्थेत जैसे थे आहे. दरम्यान, दवाखान्याच्या वास्तूची दुरूस्ती करण्याकामी आराखडा तयार करून संबंधित प्रस्ताव बांधकाम विभागाकडे वैद्यकीय आरोग्य विभागाकडूनही पाठविण्यात आला आहे.
दवाखान्याची धोकादायक स्थिती तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा त्यांनीही तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. तर ऑगस्ट महिन्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महापौर विनीता राणे यांनीही वसाहतीला भेट दिली तेव्हा दवाखान्याची दुरवस्था त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती. पण अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. यावरून दवाखान्याच्या झालेल्या पडझडीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होते. आजच्याघडीला वर्षभराचा कालावधी उलटूनही कोसळलेल्या दवाखान्याची दुरूस्ती करण्यासाठी केडीएमसीला मुहूर्त सापडलेला नाही. राज्यमंत्र्यांचे पत्र तसेच वैद्यकीय विभागाकडून दुरूस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोणतीही कृती आजवर झालेली नाही. आता त्याच परिसरात नवीन दवाखाना उभारला जाणार आहे. स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या पुढाकाराने त्या कामाचे भूमिपूजन महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला ३० जानेवारीला झाले. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. केडीएमसीच्या अर्थसंकल्पात या कामासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातून नवीन दवाखान्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली होती. परंतु आजतागायत या कामाला सुरूवात झालेली नाही. नवीन दवाखाना जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु प्राथमिक उपचारासाठी तरी पडझड झालेल्या दवाखान्याची दुरूस्ती करावी अशी येथील कुष्ठरूग्णांची मागणी आहे.
>ड्रेसिंग साहित्यांची वानवा
कल्याण डोंबिवली महापालिका कुष्ठरूग्णांना अडीच हजार रूपये मानधन देणारी राज्यातील पहिली महापालिका आहे. परंतु कुष्ठपिडीतांसाठी लागणारे ड्रेसिंगचे साहित्य महापालिकेकडून वेळेवर मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. स्थानिक हनुमाननगर कुष्ठ सेवा संस्थेच्या वतीने जानेवारी महिन्यातच केडीएमसीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लोखंडी कात्री, स्टीलच्या कात्री, पट्ट्या, ब्लेड, स्टरलाईजर मशीन, बोन कटर यासह अन्य उपचाराच्या साहित्यासह टेबल, खुर्च्या, बाकडे, वजनकाटा मिळावे याकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. परिणामी उपचार करताना ड्रेसिंग साहित्यअभावी मर्यादा येतात त्याचबरोबर मोडक्या खुर्च्या आणि टेबलांना टेकू लावून त्याचा वापर करण्याची वेळ कुष्ठपिडीतांवर आली आहे. येथील कपाटही जीर्ण झाले असून त्याच्या काचा फुटल्याने औषधांच्या साठयाची सुरक्षाही एकप्रकारे धोक्यात आली आहे. याकडे राज्य सरकारच्या सहायक संचालक ठाणे कुष्ठरोग विभागाचाही कानाडोळा झाला आहे.